Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला.! खडकवासला धरणातून रात्री 8 वाजता मुठा नदीत 3,825 क्युसेक पाण्याचा विसर्ग
आज, गुरुवार 23 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 3,825 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार 23 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 3,825 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
पुणे शहरासह घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार मुठा नदीतील विसर्ग कमी किंवा अधिक करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची तसेच नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मुठा नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात, नदीकाठावर किंवा संभाव्य पूरप्रवण भागात असलेले साहित्य, वाहने तसेच जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
सखल भागातील नागरिकांना स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, तसेच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर, धरणात होणारी पाण्याची आवक आणि नदीपात्रातील परिस्थिती यावर प्रशासनाचे लक्ष असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे. असं देखील सांगण्यात आलं आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. माहिती साठी सविनय सादर.
– कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे.






