Pune Kasba Ganpati : पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीवरील सिंदूरलेपन दूर करण्यात येणार असून, भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घडणार आहे. ही प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. याविषयी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याचे ठकार म्हणाले. यावेळी देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे. शेंदूर कवच काढण्यासाठी विविध मूर्तीतज्ज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही प्रक्रिया विशेषत: श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे. शेंदूर कवच काढणे आणि त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. मात्र याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावरच येईल. इथून पुढे होणाऱ्या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा व्यवस्थापन समितीचा अत्यंत प्रामाणिक मनोदय आहे, असे ठकार म्हणाले. पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक, ग्रामदैवत अशी कालातीत उपाधी प्राप्त असलेले श्री कसबा गणपती मंदिर अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. इसवी सन १६१४ च्या आसपास या मंदिराचे उल्लेख आढळतात. जय मिळवून देणारा असा ‘जयति गजानन’ असे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे.