Kapardikeshwar Temple: तब्बल २५ लाखांचे गुप्तदान! ओतूरच्या कपर्दिकेश्वराला अर्पण केले ९ किलोचे मौल्यवान कवच
Kapardikeshwar Temple: जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ओतूर येथे एका दानशूर भाविकाकडून नाव न सांगता २५ लाख रुपये किमतीचे ९ किलो वजनाचे चांदीचे कवच शिवलिंगाला अर्पण.

Kapardikeshwar Temple – उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वर मंदिरातील शिवलिंगाला एका दानशूर भाविकाने गुप्तदान पद्धतीने सुमारे 25 लाख रुपये किमतीचे चांदीचे कवच अर्पण केले. तब्बल नऊ किलो वजनाचे हे चांदीचे कवच शिवलिंगावर अर्पण करण्यात आले असून, या दानशूर भाविकाचा श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याबाबतची माहिती कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव महेंद्र गांधी पानसरे आणि मार्गदर्शक जी. आर. पाटील डुंबरे यांनी दिली. ओतूरचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवसाला पावणारे देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. भाविक श्रद्धेने कपर्दिकेश्वराला नवस करतात. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर शिवभक्त देवदर्शनासाठी येऊन आपला नवस फेडतात.
शिवलिंगावर चांदीचे कवच अर्पण करण्याला हिंदू धर्मात धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. श्रद्धेनुसार अथवा नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक महादेवाला चांदीचे कवच अर्पण करतात. त्याच भावनेतून एका दानशूर भाविकाने श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वराच्या शिवलिंगासाठी नऊ किलो वजनाचे,
सुमारे 25 लाख रुपये किमतीचे चांदीचे कवच गुप्तदान केले. या भाविकाने आपली ओळख जाहीर न करता मंदिराला हे दान दिल्याने श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा आदर्श निर्माण झाला आहे. श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने संबंधित दानशूर भाविकाचा यावेळी सन्मान करण्यात आला.





