प्रभात वृत्तसेवा पुणे – ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी अजूनही अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी शाळा लांब असल्यामुळे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे कठीण जाते. परिणामी अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने पाचवी ते आठवी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’ उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींनी दि. १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषद शाळांना सायकल देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सायकल बॅंकद्वारे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना सायकली दिल्या जातील. जोपर्यंत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, तोपर्यंत या सायकली त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी घरी दिल्या जातील. आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सायकल त्यांना पुन्हा संबंधित शाळेच्या सायकल बँकमध्ये जमा केली जाईल. पुन्हा याच बॅंकेतील सायकली अन्य मुलींना वापरता येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने समाजाती दानशूरांना आवाहन केले आहे. कशी मदत करू शकता? १. नवीन सायकल देणगी म्हणून देणे (मुलींसाठी) २. एक किंवा अधिक सायकली प्रायोजित करणे ३. मित्रमंडळी, संस्था, गट यांना सहभागी करून घेणे कधी व कुठे द्यायची सायकल? दानशूर व्यक्तींनी व संस्था प्रतिनिधींनी येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनानिमित्त संबंधित गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये येऊन सायकली द्याव्यात. सायकल देणाऱ्यांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. “शाळेत नियमित उपस्थिती वाढवणे, प्रवासातील अडथळे दूर करून शिक्षण सुलभ करणे, मुलींच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी सायकल बॅंक हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांनी मिळून सायकल दिली, तर हजारो विद्यार्थिनींचे शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वास जाईल. ही सायकल केवळ प्रवासाचे साधन न राहता, त्यांचा आत्मविश्वास, शिक्षकांचा आनंद आणि समाजाच्या आशेचा आधार बनेल.” – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे