Pune District : बदलत्या हवामानाचा जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका; उत्पादनात 40 टक्के घट

बेल्हे : बदलत्या हवामानाचा जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. प्रतिकुल हवामानामुळे यंदा काही द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही तर काही बागेतील घड जिरल्याने द्राक्ष उत्पादनात 30 ते 40 टक्के घट होत आहे. सध्या द्राक्ष बागांतील घडाची छाटणी सुरू असून काही बागांची पहिला तर काही दुसरी छाटणी सुरू आहे.
मागील महिन्यात डाऊनी व भुरी आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव द्राक्ष पिकावर वाढला. ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांना द्राक्ष फवारणीचा खर्च अधिक प्रमाणात वाढला. वातावरणाचा फटका तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्रातील प्रामुख्याने काळ्या जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे. हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना औषध फवारणीचा खर्च अधिकचा वाढला आहे. महागडी खते व त्यावर असलेला जीएसटी यामुळे शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. द्राक्षाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत.
जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या (ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जातो. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने चीन, बांगलादेश, दुबई, श्रीलंका आदी देशातील बाजारपेठ काबीज केली आहे. तालुक्यात बर्याच क्षेत्रात जम्बो, रेडम्लोब, शरद सीडलेस, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, सोनाका, किंगबेरी, क्रिमसन आदी जातीच्या द्राक्ष बागा आहेत. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम जम्बो, रेडग्लोब, किंगबेरी या जातीच्या द्राक्ष बागांना बसत आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये 1 हजार 20 हेक्टर मध्ये द्राक्ष बागा आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात 30 हजार टन द्राक्ष उत्पादन निघाले होते. द्राक्ष छाटणी सुरू असून परदेशात माल पाठवण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.
– गणेश भोसले, कृषी अधिकारी जुन्नर
दोन एकर क्षेत्रामध्ये मामा जम्बो व्हरायटीची लागवड केली होती. एकरी साडेतीन ते चार लाख खर्च उत्पादन खर्च आला. पहिली तोडणी चालू झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40 टक्के उत्पादनामध्ये घट झाली आहे. सर्व माल बांगलादेशामध्ये पाठवला जाणार आहे.
– पांडुरंग हाडवळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, राजुरी





