Gram Panchayat: राजकीय वाद की गैरव्यवहार? जुन्नर तालुक्यातील ग्रामसभा अचानक वादळी का ठरत आहेत?
Gram Panchayat: ग्रामसभांमधील आरोपांची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कारवाईसह वस्तुस्थिती समोर आणण्याची जुन्नर तालुक्यातील नागरिकांची मागणी.

– सुरेश भुजबळ
Gram Panchayat – जुन्नर तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामसभा अलीकडे वादळी ठरत असल्याने या ग्रामसभांमागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने काही ठिकाणी ग्रामसभेतील वातावरण तापत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या कारभारात खरोखरच गैरव्यवहार किंवा प्रशासकीय अनियमितता आहे का, की स्थानिक राजकारणातून ग्रामसभांचे वातावरण तापत आहे, याची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे आवश्यक आहे. विशेषतः महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पतींचा ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरत आहे.
ग्रामसभेचे अध्यक्षपद महिला सरपंचांकडे असताना ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्या स्वतः सक्षमपणे उत्तरे देऊ शकत आहेत का? संबंधित विषयांचा पुरेसा अभ्यास, कागदपत्रांची पूर्तता आणि आवश्यक माहिती ग्रामसभेपूर्वी उपलब्ध करून घेतली जाते का? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. महिला लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदार्या पार पाडण्यासाठी आवश्यक प्रशासकीय माहिती,
मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या महिला सरपंचाच्या अधिकारात इतर व्यक्तींचा हस्तक्षेप होत असेल, तर त्याबाबतही प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, ग्रामपंचायतीतील अंतर्गत वाद,
पदाधिकार्यांमधील मतभेद किंवा राजकीय संघर्षाचा रोख अनेकदा थेट ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायत अधिकार्यांकडे वळत असल्याची चर्चा आहे. ग्रामसभेत विविध प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी प्रशासनावर असली, तरी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना संबंधित नोंदी आणि कागदपत्रांचा आधार घेणे आवश्यक असते. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे तत्काळ उत्तर मिळाले नाही म्हणून संबंधित अधिकारीच दोषी आहेत, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणे हा ग्रामस्थांचा अधिकार आहे. मात्र, एखाद्या पदाधिकार्याच्या कारभाराबाबत असलेल्या नाराजीचा रोख थेट ग्रामसेवकांकडे वळत असेल, तर ही बाब प्रशासनासाठी चिंतेची ठरू शकते. ग्रामपंचायतीतील निर्णयप्रक्रियेत निर्वाचित पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिका वेगवेगळ्या असतात.
त्यामुळे एखाद्या निर्णयाची किंवा आर्थिक व्यवहाराची जबाबदारी निश्चित करताना संबंधित ठराव, नोंदी, खर्चाची कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रिया तपासणे आवश्यक आहे. काही ग्रामसभांमध्ये स्थानिक राजकारण, पदाधिकारी बदलाची अपेक्षा अथवा आगामी ग्रामपंचायत राजकारणातील समीकरणांमुळे वातावरण तापत आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामसभा वादळी झाली म्हणजे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाला, असा थेट निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी आरोपांमागील वस्तुस्थिती कागदपत्रे आणि अधिकृत नोंदी तपासल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. जुन्नर तालुक्यात अलीकडे वादळी ठरत असलेल्या ग्रामसभांचा प्रशासनाने सखोल आढावा घेणे गरजेचे आहे.
आरोप खरे असतील तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोप राजकीय वादातून होत असतील तर त्यामागील वस्तुस्थितीही स्पष्ट झाली पाहिजे. ग्रामसभा ही गावाच्या विकासाची दिशा ठरविणारे लोकशाहीचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ग्रामस्थांनी प्रश्न विचारावेत, पदाधिकार्यांनी त्यांना उत्तरे द्यावीत आणि प्रशासनाने वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी.






