Kalakar Katta Pune – गुडलक चौकातील कलाकार कट्ट्याचे स्थलांतर करू नका, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काॅंग्रेस महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना सोमवारी दिले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्या नेतृत्त्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे पालिकेतील गटनेते काका चव्हाण, नगरसेवक हर्षवर्धन मानकर उपस्थित होते. राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून कलाकार कट्टा हा नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या संवाद, सादरीकरण आणि विचारमंथनाचा महत्त्वाचा मंच राहिला आहे. शहरातील साहित्यिक, नाट्य, संगीत आणि विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या या ठिकाणाचे स्थलांतर करण्याऐवजी तो जतन करावा, अशी मागणी केल्याचे मानकर म्हणाले. पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी कलाकार कट्टा स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मानकर यांनी व्यक्त केली.