Kaas Pathar – जिल्ह्यातील युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या कास पठारावर पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासंदर्भाने सातारा वन विभागाने काही उपक्रम हातात घेतले आहेत. यामध्ये पॅगोडा, चेंजिंग रूम, फुले पाहण्यासाठी पायवाट तसेच छोट्या ई बसेस, वॉचिंग टॉवर यांचा समावेश आहे. फुलांच्या हंगामामध्ये मिळालेल्या दोन कोटीच्या महसूलामधून ही कामे मार्गी लावली जात आहेत. सातारा व जावळी वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने या सुविधांचा मूलभूत कार्यक्रम तयार करण्यात आला असून ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. एक सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये कास पठारावर उमलणाऱ्या फुलांच्या हंगामात सातारा वन विभागाला दोन कोटी २३ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. या कालावधीमध्ये तब्बल सात लाख पर्यटकांनी पठाराला भेट दिली. या हंगामामध्ये पुन्हा पंधरा दिवस पावसाने जोर धरल्याने हंगामावर पाणी पडले. परिणामी वन विभागाला वीस लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. दोन कोटी 23 लाख रुपयांच्या या महसूलामधून सातारा वन विभागाने पुढील हंगामाची आता तयारी सुरू केली असून 31 मेअखेर ही सर्व कामे मार्गी लावली जाणार आहेत. कास पठार कास पठाराला यंदा पर्यटकांसाठी स्वागत कमान, पॅगोडा, बेंचेस, सेल्फी पॉईंट, स्वच्छतागृह, वॉचिंग गॅलरी इत्यादी कामे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये पॅगोडा आणि स्वागत कमान ही कामे पूर्ण झाली असून सेल्फी पॉईंट आणि स्वच्छतागृहांची बांधणी ही कामे प्रगतीपथावर आहेत. पर्यटक उत्साहाच्या भरात फुलांमध्ये जाऊ नयेत यासाठी फुलांच्या कडेने दगडी चिरांचा पाथ वे तयार केला जात आहे. या पायवाटांची दुरुस्ती आणि त्याचे सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने त्याची रंगरंगोटी या कामांनासुद्धा गती दिली जात आहे. कास पठारावर ठिकठिकाणी साधारण अडीच ते तीन किलोमीटर लांबीचे पाथ वे तयार केले जाणार आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न… याबाबत सातारा वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘कास पठार आणि त्याचे जागतिक दर्जाचे स्थान यासाठी पर्यटकांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने या विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कास पठारावर प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या औषधी झाडांची लागवड आणि उभारलेल्या सुविधांना नैसर्गिक दृष्ट्या पर्यावरण अनुकूल बनवण्याचे नियोजन असल्याचे जोपळे यांनी स्पष्ट केले .