सातारा : कास पठार परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेला बारबालांचा नाच आणि झालेली हाणामारीची घटना यामुळे पठार परिसरातील संवेदनशीलता हरवत चालल्याची भीती व्यक्त होत आहे. जागतिक वारसा लाभलेल्या कास पठाराच्या परिसरात प्रदूषण होऊन पर्यावरणाला हानी पोहचू नये तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
प्रशासनाचे केवळ दुर्लक्षच नव्हे तर हितसंबंध जोपासण्यामुळे अशा प्रकारच्या घटना अधूनमधून घडतात. परंतु, जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या दृष्टीने वैशिष्ट्ये जपणाऱ्या या परिसराचे महत्त्वच कमी करण्याचे कामच नकळत होत आहे, हे लक्षात घेतले जात नाही. वास्तविक या परिसरातील पर्यावरण अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परिसरातील एकीव येथील एका हॉटेलमध्ये बारबाला नाचविण्याचा प्रकार झाला. त्याचवेळी दोन गटांमध्ये झालेल्या बाचबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात एका गटाचे दोघे जखमी झाले. पाच जणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा शहर सोडल्यानंतर यवतेश्वर घाटापासून कासपर्यंत अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट झाली आहेत. पर्यावरण जपण्यासाठी विशिष्ट नियमावलीतून ही बांधकामे करणे अपेक्षित होते. नव्याने बदलून येणारे महसूल अधिकारी आल्यावर या परिसरातील काही हॉटेलना नोटीस बजावतात. पर्यावरणप्रेमी काही काळ आक्षेप घेत राहतात. थोड्या फार काळापर्यंत या विषयांची चर्चा होत राहते. नंतर पुन्हा सर्व सुरळीत होऊन जाते. हे चक्र गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. पर्यावरण जपण्यासाठी पठार परिसरातील बांधकामांबाबत नेमके कोणते निकष आहेत, त्या निकषांचे पालन केले जाते की नाही, याबाबत कधीही नेमकी चर्चा होत नाही. दुष्काळी भागातील पाणीप्रश्न नेमकेपमाने न सोडवता त्या प्रश्नाभोवती फिरत राहून हवे ते साध्य करायचे असा प्रयत्न विविध घटकांकडून होत गेला. अशाच प्रकारे कासचे पर्यावरण आणि संवेदनशीलता हा विषय बनून गेला आहे.
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा टिकून परिसरात पर्यटन अधिक नियोजनबद्ध पद्धतीने विकसित व्हावे, स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळेल, त्याचबरोबर परिसरातील निसर्ग संपदेचे जतन होईल, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्कतेने लक्ष देण्याची आवश्यकता या घटनेमुळे पुन्हा एकदा ठळक झाली आहे. एकीव येथील घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तर झालीच पण ती कोणाच्या पाठिंब्यामुळे झाली हेही महत्त्वाचे आहे. निसर्ग जपताना किमान अशा बेकायदेशीर कृत्याला पाठबळ मिळेल असे वर्तन प्रशासनामधील जबाबदारांकडून तरी घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर ती चुकीची ठरु नये.
निसर्गाच्या मुळावरच उठाल तर…
निसर्गाने भरभरून दिले. कासच्या निसर्गरम्य परिसरात पर्यावरणाची भक्कम साखळी असल्यामुळेच वेगळे वैशिष्ट्य जपण्याचे आव्हान आपणासमोर आहे. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यांत उमलणारी रानफुले, दर काही वर्षांनी फुलणारी कार्वी आणि आठ वर्षांनी येणारी व्हायटी अशी अनेक वैशिष्ट्ये या परिसराने जपली म्हणूनच या परिसराला जागतिक वारशाचा दर्जा मिळाला. …म्हणूनच या भागात निसर्गाचे अभ्यासक येऊ लागले, …म्हणूनच या भागात येणाऱ्या पर्यटकांची सख्या वाढली, …म्हणूनच या भागातील स्थानिक लोकांनी रोजगाराची संधी मिळाली. पण निसर्गाच्या मुळावरच उठाल तर निसर्गही तडाखा दिल्याशिवाय राहत नाही, याची उदाहरणेही आपण अनुभवली आहेत. त्यामुळे आतापर्यंत झाले म्हणून पुढेही बेकायदेशीर व्हावे असे नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, आता तरी शहाणे व्हावे. अऩ्यथा पर्यावरणाची साखळी फक्त कागदावरच राहण्याची भीती आहे.