K Srikkanth Apology : मला माफ कर रोहित! माजी निवडकर्त्यांनी ‘हिटमॅन’समोर जोडले हात; १५ वर्षांनंतर २०११ च्या त्या जखमेवर झाली मलमपट्टी
K Srikkanth Apology : २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. मात्र, आजचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा भाग नव्हता.

K Srikkanth Apology to Rohit Sharma : २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने इतिहास रचला असला तरी, या यशासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागले होते. यापैकी सर्वात चर्चेचा आणि वादाचा निर्णय म्हणजे रोहित शर्माला संघातून डच्चू देणे. १५ वर्षांनंतर आता तत्कालीन मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या निर्णयाबद्दल रोहितची जाहीर माफी मागितली आहे.
२०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. मात्र, आजचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा भाग नव्हता. तत्कालीन मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, रोहितला संघात न घेण्याचा निर्णय आजही त्यांना वेदना देतो. श्रीकांत म्हणाले, “मी मागच्या वर्षी रोहितला भेटलो तेव्हा त्याची माफी मागितली. रोहितला वगळणे हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नव्हता, तर तो त्यावेळच्या रणनीतीचा भाग होता.”
१९८३ चा ‘ऑलराउंडर’ प्लॅन नडला?
“They said I had no technique.”
Kris Srikkanth looks back at how his attacking style was once criticised—only for it to become the norm in modern cricket.
Watch this conversation on CEAT Beyond The Scoreboard with Ayaz Memon (@cricketwallah)
Full episode dropping today on THE… pic.twitter.com/P4LHQ51rj1
— THE WEEK (@TheWeekLive) April 21, 2026
श्रीकांत यांच्या मते, २०११ च्या विश्वचषकासाठी त्यांनी १९८३ च्या विजयाचा ‘ब्लूप्रिंट’ वापरला होता. संघात केवळ तज्ज्ञ फलंदाजांऐवजी अशा खेळाडूंना प्राधान्य दिले गेले जे अर्धवेळ गोलंदाजी (Half All-rounders) करू शकतील. युवराज सिंगने ३६२ धावा आणि १५ विकेट्स घेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. तसेच सचिन, सेहवाग, रैना आणि युसूफ पठाण हे देखील गोलंदाजी करू शकत होते. या ‘मल्टी-डायमेंशनल’ खेळाडूंच्या नादात रोहित शर्मासारख्या प्रतिभावान फलंदाजाला संघात स्थान मिळाले नाही.
२०२७ च्या विश्वचषकावर लक्ष –
रोहित शर्माने टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी, त्याचे एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. २०२३ च्या विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली होती, पण ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आता ३८ वर्षीय रोहितची नजर २०२७ च्या विश्वचषकावर आहे. सध्या आयपीएल २०२६ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे, मात्र दुखापतीमुळे मागील काही सामन्यांना तो मुकला आहे.





