Axar Patel Captaincy : कर्णधाराचाच स्वतःवर विश्वास नाही? अभिषेक शर्माच्या वादळात अक्षर पटेलने टाकली नांगी; माजी खेळाडूचं वक्तव्य
Axar Patel Captaincy : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू कुलदीप आणि अक्षरसारखे प्रीमियर फिरकीपटू असताना पार्ट-टाईम ऑफ स्पिनर नितीश राणाकडून ४ षटके टाकून घेणे अनाकलनीय आहे.

Axar Patel Captaincy Criticism SRH vs DC : आयपीएल २०२६ मधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (DC) ४७ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याच्या रणनीतीवर क्रीडा विश्वातून मोठी टीका होत आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंच याने अक्षरच्या ‘बचावात्मक’ पवित्र्यावर ताशेरे ओढले आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने ६८ चेंडूत नाबाद १३५ धावांची ऐतिहासिक खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. हैदराबादने उभारलेल्या २४२ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ अपयशी ठरला. मात्र, या सामन्यात दिल्लीकडे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांसारखे जागतिक दर्जाचे फिरकीपटू असतानाही, त्यांनी मिळून केवळ ४ षटके टाकली, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
ॲरॉन फिंचचा कडक शब्दांत प्रहार –
“Scratching Our Heads”: Australia Great Slams Axar Patel For This Blunder After SRH Loss.@AaronFinch5#Cricket #IPL2026 #DelhiCapitals #AxarPatel #KuldeepYadav #AaronFinch #CricketAnalysis #SpinBowling #CricketNews #T20Cricket #GooglyMediaTV #NitishRana #CricketTactics pic.twitter.com/kttPm04CIY
— googlymediatv (@googlymediatv) April 22, 2026
“आम्ही सगळेच डोकं खाजवत बसलो आहोत,” अशा शब्दांत फिंचने आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, कुलदीप आणि अक्षरसारखे दिग्गज फिरकीपटू असताना पार्ट-टाईम ऑफ स्पिनर नितीश राणाकडून ४ षटके टाकून घेणे अनाकलनीय आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या डाव्या हाताच्या फलंदाजांसमोर अक्षरने गोलंदाजी करण्याचे टाळले. फिंचच्या मते, अक्षर हा भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि तो दोन वेळा वर्ल्ड कप विजेता राहिला आहे. जर तो दबावाखाली स्वतःवर विश्वास ठेवत नसेल, तर हे त्याच्या नकारात्मक मानसिकतेचे लक्षण आहे.
अक्षरची बचावात्मक मानसिकता नडली?
अक्षर पटेलचा अभिषेक शर्माविरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे, तरीही त्याने स्वतःला गोलंदाजीपासून दूर ठेवले. फिंचने सुचवले की, अभिषेकसारख्या आक्रमक फलंदाजासमोर काही चांगल्या चेंडूंनी विकेट मिळण्याची संधी होती, पण अक्षरने बचावात्मक विचार केला. सामन्यानंतर बोलताना अक्षरने कबूल केले की, गोलंदाजांनी त्यांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे पराभव पत्करावा लागला. मात्र, कर्णधार म्हणून त्याने स्वतः जबाबदारी का घेतली नाही, या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.





