Josh Inglis Record : चेपॉकवर जॉश इंग्लिसचं वादळ! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं अर्धशतक; चेन्नईच्या गोलंदाजांची केली पळता भुई थोडी
Josh Inglis Record : लखनौ सुपर जांयट्सने जोश इंग्लिसच्या वादळी खेळीच्या जोरावर सीएसकेसमोर २०३ धावांचा डोंगर उभारला.

Josh Inglis Fastest Fifty Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ्समध्ये पोहोचणे लखनौ सुपर जायंट्ससाठी जरी कठीण वाटत असले, तरी त्यांच्या खेळाडूंनी मैदानावर आपला दरारा कायम ठेवला आहे. १० मे रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सलामीवीर जॉश इंग्लिसने आपल्या बॅटिंगने अक्षरश: धुमाकूळ घातला. दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतलेल्या इंग्लिसच्या फटकेबाजीच्या जोरावर एलएसजीने सीएसकेविरुद्ध पुन्हा एक खास विक्रम नोंदवला आहे.
दुखापतीनंतरची दमदार पुनरागमन –
जॉश इंग्लिस या हंगामाच्या सुरुवातीच्या ८ सामन्यात बाहेर होता. ९ व्या सामन्यात त्याने पुनरागमन केले, मात्र पुन्हा दुखापत झाल्याने त्याला एक सामना गमवावा लागला. चेन्नईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने मैदानात उतरताच आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याच्या अर्धशतकातील ५० धावांपैकी ४८ धावा या केवळ ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने (चौकार-षटकार) आल्या होत्या.
जोश इंग्लिसने आपल्याच सहकाऱ्याचा मोडला रेकॉर्ड –
जोश इंग्लिसने सहकारी सलामीवीर मिचेल मार्शचा विक्रम मोडला, ज्याने ४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ६० धावा केल्या होत्या. जोश इंग्लिस (७७) आता आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे फक्त सुरेश रैना (८७), ट्रॅव्हिस हेड (८४) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क (७८) आहेत.
आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
| रँक | फलंदाज | धावा | चेंडू | स्ट्राईक रेट | चौके | षटकार | सामना | तारीख |
| १ | सुरेश रैना | ८७ | २५ | ३४८.०० | १२ | ६ | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब | ३० मे २०१४ |
| २ | ट्रॅव्हिस हेड | ८४ | २६ | ३२३.०७ | ११ | ६ | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | २० एप्रिल २०२४ |
| ३ | जेक-फ्रेझर-मॅकगर्क | ७८ | २४ | ३२५.०० | ११ | ५ | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स | २७ एप्रिल २०२४ |
| ४ | जॉश इंग्लिस | ७७ | २५ | ३०८.०० | ९ | ६ | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स | १० मे २०२६ |
| ५ | ॲडम गिलख्रिस्ट | ७४ | २५ | २९६.०० | ९ | ५ | डेक्कन चार्जर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स | २२ मे २००९ |
शतक हुकले, पण रेकॉर्डची बरोबरी –
इंग्लिसने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवत मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. त्याने विशेषतः ‘रिव्हर्स स्कूप’ शॉटचा वापर करून चेन्नईच्या फिल्डर्सना हतबल केले. त्याने ३३ चेंडूत ८५ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. मिचेल मार्शसोबत झालेल्या ७७ धावांच्या भागीदारीत एकट्या इंग्लिसचा वाटा ६६ धावांचा होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर लखनौ अवघ्या ३.४ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या आणि ३ वर्षांपूर्वीच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. योगायोगाने २०२३ मध्ये देखील लखनौने चेन्नईविरुद्धच ३.४ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या होत्या.





