Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय

जेमिमा रॉड्रिग्सच्या या निर्णयामागे तिची खास मैत्रीण आणि भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधना हे कारण आहे. स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्यात नुकतीच एक मोठी आणि दुःखद घटना घडली आहे, ज्यामुळे जेमिमा तिच्यासोबत राहू इच्छिते.स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणार होता. दोघांचा साखरपुडाही झाला होता.
स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले –
मात्र, लग्नाच्या दिवशी सकाळीच स्मृती मानधनाच्या वडिलांना मायनर हार्टअटॅक आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या कारणामुळे दोघांचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. सध्या स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, लग्नाच्या तणावामुळे पलाश मुच्छल यांचीही प्रकृती बिघडली होती आणि तो सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मैत्रीसाठी डब्ल्यूबीबीएल स्पर्धेला दिला नकार –
जेमिमा रॉड्रिग्सने डब्ल्यूबीबीएलमध्ये न खेळण्याच्या निर्णयावर ब्रिसबेन हीट संघाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ब्रिसबेन हीटचे सीईओ टेरी सेवेन्सन यांनी सांगितले, “जेमिमासाठी हा कठीण काळ आहे. ती महिला बिग बॅश लीगच्या अखेरच्या चार सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, ही निराशाजनक गोष्ट आहे. मात्र, स्मृती मानधनाला आधार देण्यासाठी ती भारतात थांबण्याच्या तिच्या इच्छेचा आम्ही आदर करतो. ब्रिसबेन हीट संघ जेमिमा आणि मानधनाच्या कुटुंबासोबत या परिस्थितीत उभा आहे.”
जेमिमा रॉड्रिग्सने घेतलेल्या या निर्णयामुळे तिचे आर्थिक नुकसान होणार असले तरी, तिच्या या मैत्रिणीसाठी उचललेल्या पावलाची चाहत्यांकडून खूप प्रशंसा होत आहे. जेमिमा स्मृती मानधनाच्या लग्नाच्या विधींमध्येही सहभागी झाली होती.





