Priyansh Arya : भारताचा नवा ‘सिक्सर किंग’! एका डावात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार; केएल राहुल आणि ख्रिस गेलला देखील टाकले मागे
प्रियांशने (Priyansh Arya) अवघ्या ६८ चेंडूंचा सामना करताना तब्बल १८१ धावांची वादळी आणि ऐतिहासिक खेळी साकारली.

Priyansh Arya : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना एका अशा अविस्मरणीय आणि थरारक खेळीचे साक्षीदार होता आले, ज्याची नोंद आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली आहे. दिल्ली क्रिकेट संघाचा कर्णधार प्रियांश आर्य (Priyansh Arya) याने तामिळनाडूच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा करत मैदानावर चौफेर फटकेबाजीचा महापूर आणला.
प्रियांशने (Priyansh Arya) अवघ्या ६८ चेंडूंचा सामना करताना तब्बल १८१ धावांची वादळी आणि ऐतिहासिक खेळी साकारली. या झंझावाती खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाकडून केली गेलेली आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम केला असून, दिग्गज फलंदाज केएल राहुलचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.
मैदानाच्या चारही कोपऱ्यांत चेंडू भिरकावणाऱ्या प्रियांशच्या (Priyansh Arya) या खेळीत ७ खणखणीत चौकार आणि तब्बल १९ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. २६६.१८ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. प्रियांशच्या या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २७५ धावांचा हिमालय उभा केला.
या खेळीदरम्यान प्रियांशने टी-२० क्रिकेटमधील अनेक जागतिक विक्रमांनाही गवसणी घातली. जागतिक पातळीवर टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम मोडण्यासाठी त्याला अवघ्या ७ धावा कमी पडल्या. सध्या हा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लुआन-ड्रे प्रिटोरियसच्या (१८८ धावा) नावावर आहे, तर प्रियांशने १८१ धावांसह या जागतिक यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे, प्रियांशने या खेळीद्वारे ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा २०१३ मधील आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळताना केलेल्या नाबाद १७५ धावांचा ऐतिहासिक विक्रमही मागे टाकला आहे. इतकेच नव्हे, तर कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा नवा विश्वविक्रमही प्रियांशने आपल्या नावावर कोरला आहे.
षटकारांच्या बाबतीतही त्याने न्यूझीलंडच्या फिन ॲलनची बरोबरी साधली असून, एकाच टी-२० डावात सर्वाधिक १९ षटकार ठोकण्याच्या जागतिक विक्रमात आपले नाव (Priyansh Arya) जोडले आहे. एकाच डावात विक्रमांचा असा पाऊस पाडत प्रियांश आर्यने भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी आणि दमदार ओळख निर्माण केली आहे.






