Fareed Hussain Death : जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Tragic Death of Farid Hussain in Poonch Accident : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेटर फरीद हुसैन यांच्या अकाली मृत्यूने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. २० ऑगस्ट रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत फरीदचा कारच्या दवाजाशी धडकून अपघात झाला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीवी फुटेज आता समोर आले असून, त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला, याचा उलगडा झाला आहे.
सीसीटीवी फुटेजमधील धक्कादायक दृश्य –
व्हायरल झालेल्या सीसीटीवी फुटेजमधून असे दिसते की, फरीद हुसैन स्कूटी चालवत होता. त्याचवेळी एका कारमधील व्यक्तीने अचानक कारचा दरवाजा उघडला. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की, फरीदला संभाळण्याची संधीच मिळाली नाही. त्याची स्कूटी कारच्या दरवाज्याला धडकली आणि तो खाली पडला. फुटेजवरून असे दिसते की, फरीदच्या स्कूटीचा वेग जास्त नव्हता, तरीही हा अपघात टाळता आला नाही.
#Viral Video: A man Fareed Khan, who was a renowned cricketer from Poonch, has lost his life in this incident.#Poonch #RoadAccident #greaterjammu pic.twitter.com/IycMdPQNP1
— Greater jammu (@greater_jammu) August 22, 2025
पोलिसांकडून तपास सुरू –
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. फरीदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांना त्याचा जीव वाचवता आला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजमुळे हा अपघात चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
स्थानिक क्रिकेटमधील चमकता तारा –
पूंछ जिल्ह्यातील फरीद हुसैन हे स्थानिक क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव होते. त्याने अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक मिळवला होता. मेहनती आणि प्रतिभावान असलेल्या फरीदच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्याच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा होत्या. त्याच्या अचानक निधनाने स्थानिक क्रिकेट समुदायावर मोठा आघात झाला आहे.
या दु:खद घटनेमुळे फरीदच्या चाहत्यांसह संपूर्ण पुंछ जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर या अपघाताच्या कारणांबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.





