U19 Asia Cup 2024 (IND vs BAN Final) : अंडर-19 आशिया कप 2024 चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने मोठा उलटफेर करत भारतीय संघाचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. म्हणजेच बांगलादेश संघ आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरला. उभय संघांमधील हा सामना खूपच कमी स्कोअरिंगचा होता आणि बांगलादेश संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला.
विजेतेपदाच्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारताच्या गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि बांगलादेशचा डाव 49.1 षटकात 198 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. यादरम्यान युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि हार्दिक राजने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर किरण चोरमले, केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसरीकडे बांगलादेशकडून रिझान हसनने सर्वाधिक 47 धावा केल्या तर मोहम्मद शिहाब जेम्सनेही 40 धावांचे योगदान दिले. फरीद हसननेही 39 धावांची खेळी खेळली.
FINAL | ACC MEN’S U19 ASIA CUP 2024
Bangladesh U19 🆚India U19🇧🇩 Bangladesh won by 59 runs 💥👏
PC: CREIMAS Photography#BCB #Cricket #ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/Rr60NGizAc
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 8, 2024
विजयासाठी 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपाने 4 धावांवर बसला. यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या, त्यामुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. या सामन्यात वैभव सूर्यवंशीही केवळ 9 धावा करू शकला. याशिवाय केपी कार्तिकेय 21 धावा करून तर सी आंद्रे सिद्धार्थ 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. निखिल कुमारला तर खातेही उघडता आले नाही.
भारताकडून एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार मोहम्मद अमानने (65 चेंडूत 26 धावा) आणि हार्दिक राजने (21 चेंडूत 24 धावा) शेवटपर्यंत निश्चितच लढाऊ खेळी खेळली पण ते दोघेही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही आणि भारतीय संघ अवघ्या 35.2 षटकांत 139 धावांत गडगडला.
इक्बाल हुसैन इमोनची दमदार गोलंदाजी….
या संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजीत बांगलादेशच्या इक्बाल हुसैन इमोनने सर्वाधिक13 बळी घेतले तसेच अंतिम फेरीतही त्याने 3 यश संपादन केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर आणि मालिकावीर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. मोहम्मद अजीजुल हकीम तमीम याने सुध्दा 3 गडी बाद करत विजयात महत्वाचे योगदान दिले. याशिवाय अल फहदाने 2 तर मारुफ मृधा आणि मोहम्मद रिजान होसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बांगलादेश संघाने रचला इतिहास….
बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. गेल्या आशिया चषकात त्यांनी अंतिम फेरीत यूएई संघाचा पराभव केला होता. जो 2023 मध्ये खेळला गेला होता. आणखी एक म्हणजे 2023 मध्ये अंडर-19 आशिया कपच्या उपांत्य फेरीत बांगलादेशकडूनच भारताचा पराभव झाला होता. दरम्यान, बांगलादेश संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांनी उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
ही स्पर्धा 1989 पासून खेळवली जात आहे. पण बांगलादेशचा संघ अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा असा संघ ठरला आहे, ज्यांनी दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. तर टीम इंडियाने 8 वेळा अंडर-19 आशिया चषकाच्या जेतेपदांवर कब्जा केला आहे. या दोन संघांव्यतिरिक्त, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी 1 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचवेळी, टीम इंडियाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, जेव्हा-जेव्हा भारतीय संघ अंडर-19 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता, तेव्हाही संघानं विजेतेपद पटकावले होते.