BCCI : बीसीसीआय-ड्रीम11 करार संपुष्टात! सचिव देवजीत सैकियाने केली पुष्टी, आशिया कपमध्ये प्रायोजक असणार की नाही?

BCCI Secretary Devajit Saikia on Dream 11 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि फँटसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम11 यांच्यातील प्रायोजकत्व करार संपुष्टात आला आहे. याची पुष्टी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सोमवारी केली. नव्या कायद्यामुळे ड्रीम11 किंवा अशा इतर गेमिंग कंपन्यांशी करार पुढे चालू ठेवणे शक्य नसल्याचे सैकिया यांनी स्पष्ट केले. आता बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या लीड प्रायोजकाच्या शोधात आहे.
नव्या प्रायोजकासाठी विचारमंथन सुरू –
देवजीत सैकिया म्हणाले, “नव्या कायद्यामुळे ड्रीम11 सोबत करार पुढे चालू ठेवणे कठीण आहे. आम्ही सध्या नव्या पर्यायांचा विचार करत आहोत. प्रायोजकत्वाचा स्लॉट रिक्त झाला असून, त्यासाठी योग्य पर्याय शोधण्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत.” येत्या 9 सितंबरपासून यूएईमध्ये पुरुष टी20 आशिया कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी नव्या प्रायोजकासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल का, याबाबत विचारले असता सैकिया म्हणाले, “आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु लवकरच याबाबत पावले उचलली जातील.”
ड्रीम11 चा बीसीसीआयसोबतचा प्रवास –
जुलै 2023 मध्ये ड्रीम11 ने अॅडटेक कंपनी बायजूची जागा घेत भारतीय क्रिकेट संघाचे लीड प्रायोजकत्व स्वीकारले होते. हा करार तीन वर्षांसाठी 358 कोटी रुपयांना झाला होता. याशिवाय, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही ड्रीम11 ची मोठी उपस्थिती होती. 2020 मध्ये वीवोने माघार घेतल्यानंतर ड्रीम11 आयपीएलचा लीड प्रायोजक होता.
हेही वाचा – Cooper Connolly : २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
नव्या कायद्याचा परिणाम –
अलीकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहांतून ऑनलाइन गेमिंग (प्रमोशन आणि रेगुलेशन) विधेयक 2025 मंजूर झाले असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्याला मान्यता दिली आहे. या कायद्यामुळे ड्रीम11 ने आपल्या व्यासपीठावरील सर्व पैसे आधारित ऑनलाइन गेमिंग स्पर्धा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बीसीसीआय आणि ड्रीम11 यांच्यातील करार संपुष्टात आला आहे.
आता आशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय नव्या प्रायोजकाच्या शोधाला गती देण्याची शक्यता आहे. नव्या प्रायोजकाच्या निवडीबाबत बोर्ड लवकरच ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.





