Jalaj Saxena Record : २० वर्षांची प्रतीक्षा अन् ५०० विकेट्सचा टप्पा! टीम इंडियाने डावललं, पण ‘या’ ३९ वर्षीय खेळाडूने इतिहास रचला
Jalaj Saxena Record : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा ३९ वर्षीय अनुभवी अष्टपैलू खेळाडू जलद सक्सेना, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील रणजी करंडक सामना त्याच्यासाठी खास ठरला.

Jalaj Saxena Record 500 First class Wickets : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात अनुभवी आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेनाने रणजी ट्रॉफीमध्ये एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी जलजने आपल्या प्रथम श्रेणी (First Class) कारकिर्दीतील ५०० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांपासून सातत्याने खोऱ्याने विकेट्स आणि धावा मिळवूनही या खेळाडूला कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.
पुण्याच्या मैदानात रचला इतिहास
पुण्यातील एमसीए (MCA) इंटरनॅशनल स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध गोवा यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यात जलज सक्सेना यांनी ही किमया साधली. गोव्याविरुद्ध खेळताना जलजने महाराष्ट्रासाठी पहिल्या डावात ७९ धावा देऊन ६ गडी बाद केले. या दमदार कामगिरीसह त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०२ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने नरेंद्र हिरवानी आणि विनय कुमार सारख्या दिग्गजांना मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे.
२० वर्षांची तपश्चर्या अन् ‘दुर्दैवी’ योगायोग –
१९८६ मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या जलज सक्सेनाने २००५ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मागील २० वर्षांपासून तो घरगुती क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहेत आणि विकेट्सही घेत आहेत.
- प्रथम श्रेणी सामने: १५६
- एकूण विकेट्स: ५०२ (३५ वेळा एका डावात ५ विकेट्स)
- एकूण धावा: ७,२०२ (१४ शतकं आणि ३५ अर्धशतकं)
इतकी जबरदस्त आकडेवारी असूनही, जलज सक्सेनाला भारतीय संघाची निळी जर्सी कधीच परिधान करता आली नाही. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, जलज सक्सेना हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात दुर्लक्षित खेळाडूंपैकी एक आहे.






