Ramkrishna Ghosh Over : ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा…मराठमोळ्या पठ्ठ्याच्या मेडन ओव्हरने महाराष्ट्राचा थरारक विजय! पाहा VIDEO

Ramkrishna Ghosh Maiden Over in MAH vs GOA match : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मधील एलिट ग्रुप ‘सी’ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात झालेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या श्वास रोखून धरणारा ठरला. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या २४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोवा विजयाच्या उंबरठ्यावर होता, मात्र अष्टपैलू रामकृष्ण घोष याने शेवटच्या षटकात अशक्य वाटणारा विजय महाराष्ट्राला मिळवून दिला. केवळ ५ धावांनी महाराष्ट्राने हा विजय साकारला.
शेवटच्या ६ चेंडूंचा थरार अन् रामकृष्णची जलवा-
सामन्याचे शेवटचे षटक सुरू झाले, तेव्हा गोव्याला विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज होती आणि हातात एक विकेट शिल्लक होती. मैदानावर ललित यादव ५७ धावांवर नाबाद खेळत असल्याने गोव्याचा विजय निश्चित मानला जात होता. अशा कठीण प्रसंगी कर्णधाराने चेंडू रामकृष्ण घोषच्या हाती सोपवला. घोषने दबावाखाली ढळू न देता अचूक टप्पा राखला आणि शेवटचे संपूर्ण षटक ‘निर्धाव’ (Maiden Over) टाकत गोव्याला विजयापासून रोखले. रामकृष्णने १० षटकांत केवळ ३५ धावा देऊन १ विकेट्स घेतली.
A decisive final over and bowling masterclass 💥
Goa needed 6 runs off 6 balls but Ramakrishna Ghosh bowls a maiden in the 50th over restricting Goa to further accelerate, guiding Maharashtra to victorious win by runs in the Vijay Hazare Trophy.#mcacricket #TeamMaharashtra… pic.twitter.com/8HZsVOOiFW
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) January 9, 2026
ऋतुराज गायकवाडचे दिमाखदार शतक –
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत १३४ धावांचे शानदार शतक ठोकले. त्याला विकी ओस्तवालने ५३ धावांची मोलाची साथ दिली, ज्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद २४९ धावांपर्यंत मजल मारली.
गोव्याची झुंज ठरली अपयशी –
२५० धावांचा पाठलाग करताना गोव्याने कश्यप बखले आणि स्नेहल कौथनकर यांच्या ८३ धावांच्या सलामीमुळे दमदार सुरुवात केली होती. मात्र, मधल्या फळीतील पडझडीमुळे गोव्याचा डाव डळमळीत झाला. अखेरच्या टप्प्यात ललित यादवने (५७*) गोव्याला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण घोषच्या जादुई गोलंदाजीसमोर गोव्याची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा डाव २४४ धावांवर मर्यादित राहिला.
हेही वाचा – Jay Shah Statement : ‘रोहितच आमचा कर्णधार!’; सूर्या समोर असतानाच जय शाह यांनी असं का म्हटलं? पाहा VIDEO
सीएसकेकडून खेळताना दिसणार रामकृष्ण घोष?
विजय हजारे ट्रॉफीमधील या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात सीएसकेने रामकृष्ण घोषला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. गेल्या हंगामात त्याला संधी मिळाली नसली तरी, संघ व्यवस्थापनाने आयपीएल २०२६ साठी त्याला रिटेन (कायम) केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील हा फॉर्म पाहता, आगामी आयपीएलमध्ये तो धोनीच्या संघातून पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे.





