South Africa Squad : टी-२० वर्ल्ड कपआधी संघाला दुहेरी झटका! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर; ‘या’ स्फोटक फलंदाजांची एन्ट्री
South Africa Squad : दुखापतीमुळे दोन स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बदली खेळाडूंची घोषणा केली आहे.

South Africa Squad Replacement for T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ ला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक संघांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली असून आता यात दक्षिण आफ्रिकेचे नावही जोडले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाले असून, बोर्डाने तातडीने त्यांच्या बदली खेळाडूंची (Replacements) घोषणा केली आहे.
डी जॉर्जी आणि फरेरा बाहेर –
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी जॉर्जी आणि अष्टपैलू डोनोवन फरेरा यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकावे लागणार आहे. डी जॉर्जीला भारत दौऱ्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप सावरलेला नाही. दुसरीकडे, डोनोवन फरेराच्या खांद्याला ‘SA20’ लीग दरम्यान दुखापत झाली होती. हे दोन्ही खेळाडू बाहेर पडणे हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रिकल्टन आणि स्टब्सची संघात एन्ट्री –
SQUAD ANNOUNCEMENT and WORLD CUP UPDATE 🚨
Proteas Men’s batters Tony de Zorzi and Donovan Ferreira have been ruled out of the upcoming three-match KFC T20 International (T20I) series against West Indies and the ICC Men’s T20 World Cup 2026 in India and Sri Lanka due to injury.… pic.twitter.com/BG0fjU2eR0
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 22, 2026
या दोन्ही खेळाडूंच्या जागी दक्षिण आफ्रिकेने रायन रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा संघात समावेश केला आहे. रायन रिकल्टन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने SA20 मध्ये १५६ च्या स्ट्राइक रेटने ३३७ धावा कुटल्या आहेत. तसेच, ट्रिस्टन स्टब्स आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सुरुवातीला तो मुख्य संघात स्थान मिळवू शकला नव्हता, मात्र आता त्याला नशिबाने संधी मिळाली आहे.
आणखी तीन खेळाडूंच्या फिटनेसबद्दल साशंकता –
दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी इथेच संपलेल्या नाहीत. संघाचे मुख्य खेळाडू डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी आणि डेवाल्ड ब्रेविस हे देखील सध्या दुखापतींशी झुंज देत आहेत. या तिघांची सध्या फिटनेस चाचणी सुरू असून, जर ते फिट ठरले नाहीत तर ३१ जानेवारीपूर्वी संघात आणखी बदल पाहायला मिळू शकतात. आयसीसीच्या नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय संघात बदल करता येणार आहेत.





