Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड आहेत तरी कुठे? कपिल सिब्बल यांचा अमित शहांना प्रश्न

Jagdeep Dhankhar | Kapil Sibal | Amit Shah : दि. २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर, जगदीप धनखड सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. याशिवाय, त्यांचे कोणतेही विधान बाहेर आलेले नाही.
दरम्यान, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जगदीप धनखड यांच्याबद्दल प्रश्न विचारला आहे. खासदार कपिल सिब्बल यांनी विचारले आहे की, जगदीप धनखड आहेत तरी कुठे?
कपिल सिब्बल यांनी लिहिले आहे की, जगदीप धनखड कुठे आहे हे आपल्याला सांगता येईल का? ते सुरक्षित आहेत का? त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य का नाही? अमित शहांना माहित असले पाहिजे! ते आपले उपराष्ट्रपती होते; देशाने त्यांची काळजी केली पाहिजे.
त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्हाला त्यांच्या ठावठिकाणाबद्दल काहीही माहिती नाही. मी आधी बेपत्ता महिलांबद्दल ऐकले होते, परंतु पहिल्यांदाच उपराष्ट्रपती बेपत्ता झाल्याचे ऐकले आहे. आता असे दिसते की विरोधकांना जगदीप धनखड यांना वाचवावे लागेल.
मी अनेक वेळा फोन केला :
कपिल सिब्बल म्हणाले की, मी धनखड यांना अनेक वेळा फोन केला. त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकाने फोन उचलला आणि सांगितले की, ते विश्रांती घेत आहेत. तेव्हापासून कोणीही फोन उचलत नाही.
अनेक नेत्यांनी असेही म्हटले की, धनखड फोन उचलत नाहीत. मग आता आपण काय करावे? आपण हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी की आणखी काही?





