Amit Shah : “आता जम्मू आणि काश्मीर दहशतवादापासून मुक्त होईल” – अमित शहा

नवी दिल्ली – काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामधील दहशतवादी आमच्या सरकारच्या कार्यकाळात मारले गेले. ऑपरेशन सिंदूर हा दहशतवाद्यांच्या हृदयावर हल्ला आहे. जोपर्यंत शत्रू घाबरत नाही किंवा सुधारणा करत नाही तोपर्यंत कोणताही निर्णायक निकाल येत नाही.
आता जम्मू आणि काश्मीर दहशतवादापासून मुक्त होईल. हा नरेंद्र मोदी सरकारचा संकल्प आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीर घेणार आहे, असे उत्तर ऑपरेशन सिंदूरवरील राज्यसभेतील विशेष चर्चेला गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिले.
अमित शहा म्हणाले, काँग्रेसने दहशतवादाला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. आम्ही प्रत्युत्तर दिले. आता दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांच्या स्वप्नातही भारताचे क्षेपणास्त्रे दिसत असतील. देशातील जनतेसमोर अभिमानाने म्हणतो की, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही.
विरोधकांनी विचारले की दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा पुरावा काय आहे? पी. चिदंबरम यांना विचारू इच्छितो की, तुम्हाला कोणाला वाचवायचे होते? असा सवाल त्यांनी केला. चिदंबरम यांनी काँग्रेसची मानसिकता संपूर्ण जगासमोर उघड केली असल्याचे ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले आहे की, सरकारला धर्माच्या नावावर ऑपरेशन ठेवण्याशिवाय काहीही माहिती नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला कोणते नाव ठेवायचे होते. हे लोक हिंदू-मुस्लिम दृष्टिकोनातून सर्वकाही पाहतात. आपल्या सैन्याच्या युद्धाच्या घोषणेकडे या दृष्टिकोनातून पाहू नये, असे ते म्हणाले.
काँग्रेस म्हणत आहेत की ‘ऑपरेशन महादेव’ हे नाव धार्मिक आहे. ते विसरले आहेत का की, ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा नारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेवचा जयघोष करून मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला, असे शहा म्हणाले.
दहशतवादावर भाजपला प्रश्न विचारण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. देशात दहशतवाद पसरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होटबँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण, असे शहा यांनी राज्यसभेत म्हटले.





