Sanjay Raut : इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यावरून अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील या युद्धाबाबत एक वक्तव्य केले होते. संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरुन (ट्वीटर) यहुदींविरोधात पोस्ट केली होती. मात्र आता इस्रायलने या विधानासंदर्भात आक्षेप घेतला असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. इस्रायली दूतावासाने यहुदींसंदर्भात करण्यात आलेल्या चुकीच्या विधानावरुन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कठोर शब्दांमध्ये एक पत्र लिहिलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामधील परिस्थिती विषद करणारी एक बातमी ट्विटरवर पोस्ट केली होती. यासह कॅप्शनमध्ये म्हटले होते की, “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होता, हे आता समजतंय का?” या पोस्टवरून वाद निर्माण होण्यास सुरुवात होताच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, खासदार राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गाझा पट्टीत शेकडो लहान मुलांची हत्या झाली आहे. ते पाहून मी माझी भावना व्यक्त केली होती. मी तो विध्वंस पाहून म्हटलं की, म्हणूनच हिटलरने तुमचा तिरस्कार केला असेल. नंतर मला कळाले की हे चुकीचे आहे. यामुळे आपल्या ज्यू समुदायाच्या भावना दुखावल्या असतील. मग मी ती पोस्ट मागे घेतली. मी ती पोस्ट डिलीट करून बरेच वेळ लोटले. त्यानंतर आता त्यांनी पत्र लिहिलं आहे. नक्कीच त्यांना कोणी तरी संजय राऊतला विरोध करण्यासाठी हे पत्र लिहाले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी गाझामधील रुग्णालयामधील ‘गंभीर परिस्थिती’बद्दल भाष्य करताना एक पोस्ट केली होती. हिंदीमध्ये पोस्ट करत संजय राऊत यांनी, “हिटलर ज्यू समाजाचा एवढा द्वेष का करत होता? हे आता तुम्हाला समजतं का?” अशी पोस्ट केली होती. नंतर राऊत यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. मात्र तोपर्यंत इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. राऊत यांनी हे ट्वीट डिलीट करण्याआधी ते 2,93,000 हून अधिक लोकांनी पाहिले होते.