Riyan Parag Captaincy : परागच्या कप्तानीचा ‘इरफान’ फॅन! रियान परागच्या ‘त्या’ दोन निर्णयांचे पठाणकडून कौतुक, पाहा VIDEO
Riyan Parag Captaincy : भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने राजस्थानचा नवा कर्णधार रियान पराग याच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे.

Irfan Pathan praises Riyan Parag Captaincy RR vs GT IPL 2026 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या विजयाचे श्रेय फलंदाज-गोलंदाज यांच्या इतकेच कर्णधार रियान परागच्या धाडसी निर्णयांना दिले जात आहे. इरफान पठाणच्या मते, मोक्याच्या क्षणी परागने घेतलेले निर्णय त्याच्यातील प्रगल्भ नेतृत्व सिद्ध करतात.
डेथ ओव्हर्समधील ‘ती’ चाल ठरली गेमचेंजर –
सामना शेवटच्या टप्प्यात असताना १९ वे षटक कोणाला द्यावे, हा मोठा प्रश्न होता. रियान परागने आपला सर्वात अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यावर विश्वास दाखवला. आर्चरने १९ व्या षटकात केवळ ४ धावा देऊन गुजरातला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर शेवटच्या षटकात ११ धावांचा बचाव करण्यासाठी परागने तुषार देशपांडेच्या हाती चेंडू सोपवला. तुषारनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत फक्त ४ धावा दिल्या आणि राजस्थानला ६ धावांनी विजय मिळवून दिला.
इरफान पठाणने रियान परागचे केले कौतुक –
View this post on Instagram
इरफान पठाण म्हणाला, “आतापर्यंतच्या हंगामातील हा सर्वोत्तम सामना होता. कर्णधार म्हणून रियान परागने आदर मिळवणे राजस्थानसाठी महत्त्वाचे होते. त्याने शेवटच्या षटकात एक कठीण निर्णय घेतला, जो संघाच्या फायद्याचा ठरला. यामुळे एक कर्णधआर म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढेल. १९ वे षटक सहसा सर्वात अनुभवी गोलंदाजाला दिले जाते, त्यामुळे रियान परागने त्याचा सर्वात अनुभवी गोलंदाज आर्चरवर विश्वास ठेवला.”
राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय –
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ध्रुव जुरेलच्या ७५ (४२ चेंडू), यशस्वी जैस्वालच्या ५५ आणि वैभव सूर्यवंशीच्या ३१ धावांच्या जोरावर २० षटकात ६ बाद २१० धावा केल्या होत्या. २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शनने ७३ धावांची झुंजार खेळी केली. जोस बटलर (२६), राशिद खान (२४) आणि कगिसो रबाडा (२३) यांनी प्रयत्न केले, मात्र २० षटकांत गुजरातला ८ बाद २०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय आहे, तर गुजरातला सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे.





