दुबई – इराणने ताब्यात घेतलेला व्हिएतनामचा तेलवाहू टॅंकर आज मुक्त करण्यात आला. आण्विक कराराच्या मुद्द्यावरून इराणचे पाश्चात्य देशांबरोबरचे संबंध ताणले गेले असतानाच व्हिएतनामबरोबरचा एक तणाव आता निवळला आहे.
व्हिएतनामचे “द सोथीज’ हे तेलवाहू जहाज इराणच्या बंदर अब्बास बंदरातून बाहेर पडून जवळच्या ओमानच्या आखातात पोहोचले आहे. तेथे हे जहाज नांगर टाकून थांबलेले आढळून आले आहे. मात्र त्या टॅंकरवरील कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
इराणने हे तेलवाहू जहाज आता सोडून दिले आहे. तेल हस्तांतरित केल्यानंतर हे जहाज काल रात्रीच इराणच्या समुद्रातून बाहेर पडले आहे, असे संयुक्त राष्ट्रातील इराणचे प्रवक्ते शाहरोख नाझेमी यांनी सांगितले. इराणमधील कोर्टाच्या आदेशांनुसार या जहाजावरील तेल काढून घेण्यात आले असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.
मात्र या वृत्तावर व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मध्यपूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकेच्या नौदलाने मात्र यांदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनी 24 ऑक्टोबरला एमव्ही सोथीज या व्हिएतनामच्या जहाजाचा ताबा घेतला होता. इराणमधून तेल निर्यातीची परवानगी नसतानाही तेल नेले जात असल्याचा आरोप इराणने केला होता.