IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर! ‘या’ खेळाडूच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष

IPL 2026 Auction Players Short List : आयपीएल २०२६ च्या लिलावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षीच्या ऑक्शनमध्ये एकूण ३५० खेळाडू भाग घेणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) सर्व फ्रँचायझींशी चर्चा करून ही अंतिम यादी निश्चित केली आहे. लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबीच्या एतिहाद अरेनामध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.
लिलावासाठी निवडलेल्या ३५० खेळाडूंमध्ये २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. फ्रँचायझी एकूण ७७ उपलब्ध स्लॉट्ससाठी बोली लावतील, ज्यात परदेशी खेळाडूंसाठी ३१ जागा आरक्षित आहेत.
डी कॉकची अचानक एंट्री; बेस प्राइस निम्मी –
बीसीसीआयने सुरुवातीला १३५५ खेळाडूंची एक मोठी यादी तयार केली होती. त्यातून फ्रँचायझींच्या मागणीनुसार ३५० खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या अंतिम यादीत ३५ नवीन नावांचा समावेश आहे, ज्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक हे सर्वात मोठे नाव आहे.
डी कॉकचे नाव सुरुवातीला यादीत नव्हते, परंतु एका फ्रँचायझीच्या शिफारशीनंतर त्याचा समावेश करण्यात आला आहे. तो यष्टीरक्षक-फलंदाजांच्या तिसऱ्या सेटमध्ये समाविष्ट आहे. ३३ वर्षीय डी कॉकने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शतक झळकावले होते. याच कारणामुळे त्याने आयपीएलमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची बेस प्राइस यावेळी १ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे, जी मागील मेगा ऑक्शनमधील २ कोटी रुपयांपेक्षा निम्मी आहे.
बोलीसाठी प्रमुख खेळाडू –
अंतिम यादीत अनेक श्रीलंकेच्या खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यात ट्रेवीन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा आणि दुनिथ वेल्लालगे यांचा समावेश आहे. लिलावाची सुरुवात कॅप्ड खेळाडूंपासून होईल. यात फलंदाज, अष्टपैलू, यष्टीरक्षक-फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि त्यानंतर फिरकीपटूंचा क्रम असेल.
हेही वाचा – IND vs SA : सलामीवीर कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्याने दिले थेट उत्तर
२ कोटी बेस प्राइस असलेल्या ४० खेळाडूंमध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. रवी बिश्नोई आणि वेंकटेश अय्यर. लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये कॅमरन ग्रीनसह डेवॉन कॉनवे, जेक फ्रेजर-मॅकगर्क, सर्फराझ खान, पृथ्वी शॉ आणि डेव्हिड मिलर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यावर्षीही ऑक्शनमध्ये ‘एक्सेलरेटेड राऊंड’ (Accelerated Round) लागू होईल, जी ७० व्या खेळाडूनंतर सुरू होईल. यानंतर, फ्रँचायझींना पुन्हा एकदा बोली लावण्यासाठी खेळाडूंची नावे विचारली जातील.





