IPL 2024 (RR vs SRH Match 50) : हैदराबादसमोर आज टेबल टॉपर राजस्थानचे आव्हान, जाणून घ्या, ‘हेड-टू-हेड’ रेकाॅर्डसह सामन्याबाबतचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

IPL 2024 ( Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Match 50 ) : आयपीएल 2024 चा 50 वा सामना आज (गुरुवार, 2 मे) संध्याकाळी 7.30 वाजता हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत राजस्थान संघ 9 पैकी 8 सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानचे 16 गुण आहेत. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादचा संघ गेल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या कामगिरीनंतर पराभूत होताना दिसत आहे.
हैदराबादला मागील दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत राजस्थानविरूध्द सामना जिंकून पराभवाची हॅट्ट्रिक रोखण्याकडे सनरायझर्स हैदराबादचे लक्ष असेल. राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. राजस्थानने हा सामना 7 विकेटने जिंकला होता.
सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2024 मध्ये 9 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादचा शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 78 धावांनी पराभव केला होता. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला होता. सलग दोन पराभवांमुळे हैदराबाद पाचव्या स्थानावर आले आहे. अशा स्थितीत पराभवामुळे त्यांचा प्लेऑफमधील मार्ग कठीण होईल.
हेड-टू-हेड रिकाॅर्ड….
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 18 सामने खेळले गेले आहेत. यापैकी राजस्थानने 9 आणि हैदराबादने तेवढेच सामने जिंकले आहेत. म्हणजे दोन्ही संघात स्पर्धा तुल्यबळ आहे.
खेळपट्टी अहवाल
हैदराबादच्या खेळपट्टीवर झालेल्या याआधीच्या सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, येथे फलंदाजांचे वर्चस्व आहे. येथील खेळपट्टी पूर्णपणे सपाट आहे. इथे अनेक वेळा 200 पेक्षा जास्त आणि 250 धावा झाल्या आहेत. दोन्ही डाव एकत्र केले तर 500 धावांचा टप्पाही पार केला आहे. येथे गोलंदाजीत फिरकीपटू नक्कीच काही प्रभाव दाखवू शकतात. बाकी वेगवान गोलंदाजांसाठी इथे फार काही नाही. सामना सुरू झाला की काही हालचाल होऊ शकते, अन्यथा केवळ फलंदाजच मॅच चालवताना दिसतील. हैदराबादची ताकद ही त्याची फलंदाजी आहे हे मागील सामन्यांमधूनही दिसून आले आहे. त्यानुसार खेळपट्टीही दिसेल. त्यामुळे, आणखी काही नवीन रेकॉर्ड बनताना दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.
हैदराबादची गेल्या दोन सामन्यांमध्ये खराब गोलंदाजी
गेल्या दोन सामन्यांमध्ये हैदराबादची गोलंदाजी अत्यंत खराब होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, शाहबाज अहमद आणि टी नटराजन यांनी षटकामागे 9 धावा दिल्या. याच कारणामुळे चेन्नईने 200 हून अधिक धावा केल्या होत्या. नंतर टर्निंग ट्रॅकवर चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव आणला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजी कमकुवत होती. यामुळे ते हरले. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ही कमजोरी दूर करावी लागेल.
राजस्थान खेळत आहे एका युनिटप्रमाणे…
राजस्थान रॉयल्सचा संघ एका युनिटसारखा खेळताना दिसत होता. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे मॅच विनर्स उदयास येत आहेत. संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांनी गोलंदाजीत आघाडी घेतली आहे. चहलने आतापर्यंत 13 तर बोल्टने 10 विकेट्स घेतल्या आहेत.





