Rinku Singh Record : रिंकू सिंगने आंद्रे रसेलला मागे टाकत केकेआरसाठी नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू
Rinku Singh Record : रिंकू सिंगने केकेआरच्या इतिहासात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

Rinku Singh Most Catches Record for KKR : आयपीएलच्या १९व्या हंगामात गुरुवारी ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंगने आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांचे महत्त्वाचे झेल टिपताच रिंकूने केकेआरच्या इतिहासात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिंकू आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रिंकू सिंगने दिग्गजांना टाकलं मागे
रिंकू सिंगच्या नावावर आता केकेआरसाठी एकूण ४१ झेल जमा झाले आहेत. या कामगिरीसह त्याने संघाचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल (४० झेल) याला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. या यादीत फिरकीपटू सुनील नरेन ३६ झेलांसह तिसऱ्या, तर माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ३० झेलांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रिंकूने आतापर्यंत केकेआरसाठी ६० सामने खेळले असून, त्याने फलंदाजीतही १४५.५० च्या स्ट्राईक रेटने ११३२ धावा कुटल्या आहेत.

रिंकू सिंगने केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेण्याचा आंद्रे रसेलचा विक्रम मोडला. (Rinku Singh Record)
केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (IPL) :
| खेळाडूचे नाव | एकूण झेल |
| रिंकू सिंग | ४१ |
| आंद्रे रसेल | ४० |
| सुनील नरेन | ३६ |
| मनोज तिवारी | ३० |
एकाच संघासाठी सर्वाधिक झेल घेणारे ‘शूरवीर’ –
आयपीएलच्या इतिहासात एकाच फ्रँचायझीसाठी सर्वाधिक झेल घेण्याचा जागतिक विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आरसीबीसाठी ११७ झेल घेतले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड (१०३ झेल) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रिंकू सिंगने केकेआरसाठी ४१ झेल घेऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिंकूची ही कामगिरी पाहता, तो केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही संघाचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.





