KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबादने उघडले विजयाचे खाते, केकेआरचा सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभव
KKR vs SRH : या विजयासह हैदराबादने यंदाच्या हंगामातील विजयाचे खाते उघडले आणि कोलकात्याला घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला.

SRH vs KKR Sunrisers Hyderabad beat KKR by 65 runs : आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादने यंदाच्या हंगामातील विजयाचे खाते उघडले असून, कोलकात्याला मात्र सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे.
ईडन गार्डन्सवर धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी वादळी सुरुवात केली. अभिषेक शर्मा (४८) आणि ट्रॅव्हिस हेड (४६) यांनी अवघ्या ३४ चेंडूत ८२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर हेनरिक क्लासेनचे अर्धशतक (५२) आणि नितीश कुमार रेड्डीच्या ३९ धावांच्या जोरावर हैदराबादने २२६ धावांचा विशाल डोंगर उभा केला.
DONE AND DUSTED! ✅
🎥 Jaydev Unadkat finishes in style and @SunRisers have their ✌️points 🧡
Scorecard ▶️ https://t.co/iCMFpDudP7#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvSRH pic.twitter.com/54FBHNcWAz
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2026
मुझरबानीचा एकाकी लढा –
कोलकात्याची गोलंदाजी महागडी ठरली असली तरी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने ४१ धावा देत ४ महत्त्वाचे बळी टिपले. यामध्ये अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेनसारख्या बड्या फलंदाजांचा समावेश होता. मात्र, इतर गोलंदाजांकडून साथ न मिळाल्याने हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यापासून कोलकाता रोखू शकले नाही.
केकेआरची फलंदाजी ढेपाळली –
प्रत्युत्तरात २२७ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात आश्वासक झाली होती. फिन ॲलनने ७ चेंडूत २८ धावा कुटल्या, तर आंगकृष रघुवंशीने ५२ धावांची खेळी केली. मात्र, आंगकृष धावबाद झाला आणि तिथूनच कोलकात्याचा डाव घसरला. रिंकू सिंग (३५) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने संपूर्ण संघ १६१ धावांत गारद झाला. हैदराबादकडून जयदेव उनादकटने २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.





