IPL Live Cricket Score, DC vs KKR Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.2 षटकांत 166 धावांवर गारद झाला. दिल्लीचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे. यासोबतच कोलकाताने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
कोलकाताने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. या विजयासह कोलकाता संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे दोन गुण आहेत. कोलकाताला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 8 एप्रिल रोजी चेन्नई येथे पुढील सामना खेळायचा आहे. त्याचवेळी, दिल्लीचा संघ आपला पुढचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 7 एप्रिलला वानखेडेवर खेळणार आहे.
विजयासाठी 273 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटलची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकातच वैभव अरोराने पृथ्वी शॉला वरुणकरवी झेलबाद केले. त्याला 7 चेंडूत 10 धावा करता आल्या. त्यानंतर लगेगच दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या षटकात दुसरा धक्का बसला. मिचेल स्टार्कने मिचेल मार्शला रमणदीप सिंगकडे झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. या मोसमातील स्टार्कची ही पहिली विकेट होती. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र, गेल्या दोन सामन्यांत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
चौथ्या षटकात 27 धावसंख्येवर दिल्लीला लगेगच तिसरा धक्का बसला. मिचेल मार्शनंतर प्रभावशाली खेळाडू अभिषेक पोरेलही खाते न उघडताच बाद झाला. पोरेलला वैभव अरोराने नरेनच्या हाती झेलबाद केले. वैभवला मिळालेली ही दुसरी विकेट होती. त्यानंतर दिल्लीला चौथा आणि मोठा धक्का पाचव्या षटकात 33 धावसंख्येवर बसला. स्टार्कचा चेंडू वॉर्नरच्या बॅटला लागून विकेटवर आदळला. 13 चेंडूत 18 धावा करून तो बाद झाला. याआधी स्टार्कने मिचेल मार्शला बाद केले होते.
यावेळी दिल्लीची अवस्था 4 बाद 33 अशी बिकट बनली होती. त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत व ट्रायस्टन स्टब यांनी डाव सावरला. 12 षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा अशी होती. दरम्यान पंतने लीगमधील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्यानं 23 चेंडूत 17 वे अर्धशतक लगावले. त्यानंतर मात्र, तो लगेचच बाद झाला. त्याने 55 धावांच्या खेळीत 25 चेंडूत 4 चौकार व 5 षटकार फटकावले. पंत परतल्यावर लगेचच पुढच्याच चेंडूवर अक्सर पटेलही बाद झाला. वरुण चक्रवर्तीने दोन चेंडूत दोन विकेट घेत या सामन्यात आपल्या संघाचा विजय निश्चित केला आहे. त्याने आधी ऋषभ पंतला बाद केले आणि नंतर अक्षर पटेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यावेळी दिल्लीची 12.3 षटकात 6 बाद 126 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर 15 व्या षटकात 159 धावांवर दिल्लीने सातवी विकेट गमावली. वरुण चक्रवर्तीने तिसरी विकेट घेतली. ट्रस्टन स्टब्स 32 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले.त्यानंतर संघाने सातत्याने विकेट गमावल्या. सुमित कुमार (7), रसिक दार सलाम (1) आणि ॲनरिक नोर्टजे (4) काही विशेष करू शकले नाहीत आणि दिल्लीचा संपूर्ण संघ 17.2 षटकांत 166 धावांत गारद झाला. त्यामुळे दिल्लीला 106 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कोलकाता नाईट रायडर्सने आपला दबदबा कायम राखला. वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी मिचेल स्टार्कने आयपीएल 2024 मध्ये विकेटचे खातेही उघडले आहे. त्याने 3 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. दरम्यान, वैभव अरोरानेही प्रभावित केले, ज्याने 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सविरूध्द नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला. कारण आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये प्रथम खेळून धावांचा डोंगर उभा करताना 20 षटकांत सात विकेट गमावत 272 धावा केल्या. ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यादरम्यान कोलकाताच्या डावात एकूण 22 चौकार व 18 षटकार आले.
या मोसमात आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्याही झाली. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (27 मार्च) 277 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकूण T20 मध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. 272 धावा ही कोलकात्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध सहा विकेट्सवर 245 धावा केल्या होत्या.
कोलकाताचा डाव….
सुनील नरेन आणि फिलिप सॉल्ट यांनी सामन्याची झंझावाती सुरुवात केली. त्यानी पहिल्या विकेटसाठी 4.3 षटकांत 60 धावा जोडल्या. नॉर्टजेने ही भागीदारी तोडली. त्याने सॉल्टला (18) बाद केले. यानंतर नरेनने 18 वर्षांचा युवा भारतीय फलंदाज अंगक्रिश रघुवंशीसह चौकार आणि षटकार ठोकले. या दोघांनी 48 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली.
नरेनने आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. त्याला मार्शने बाद केले. त्याचवेळी, अंगकृश रघुवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 27 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर 11 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. तर नरेन-रघुवंशीनंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी तुफानी खेळी खेळली.
रिंकू आठ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. कोलकात्याच्या डावातील 20 वे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा आला आणि त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रसेलला शानदार यॉर्कर टाकून क्लीन बोल्ड केले. या यॉर्करवर रसेलचा तोल गेला आणि तो पडला. त्याने 19 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशांतने रमणदीपला पायचीत केले. त्याला दोन धावा करता आल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांचे मोडलं कंबरडे…
व्यंकटेश अय्यर पाच धावांवर तर स्टार्क एका धावेवर नाबाद राहिला. इशांतने 20 व्या षटकात केवळ आठ धावा दिल्या. दिल्लीकडून नॉर्टजेने 4 षटकात 59 धावा देताना तीन बळी घेतले. तर, इशांतने दोन विकेट घेतल्या. इशांतने 3 षटकात 43 धावा दिल्या. खलील आणि मार्शला प्रत्येकी एक विकेट मिळाली. खलील यानं 4 षटकात 43 तर मार्शनं 3 षटकात 37 धावा दिल्या. याव्यतिरिक्त रसिख डार सलामने 3 षटकात 47 धावा, सुमित कुमारने 2 षटकात 19 आणि अक्षर पटेलनं 1 षटकात 18 धावा दिल्या. या तिघां गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही.