लखनौ -इंडियन प्रिमिअर लीगच्या 30 व्या सामन्यात येथील एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. सामन्याच्या सुरुवातीला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दीक पंड्याच्या 66 आणि वृद्धीमान सहाच्या 47 धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने 6 बाद 135 धावा केल्या. मात्र मोहित शर्माच्या अखेरच्या षटकांत सलग चार चेंडूंवर दोन धावबादसह चार विकेट्स पडल्याने लखनौ सुपर जायंटसला 7 बाद 127 धावाच करता आल्या.
136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आणि काइल मेयर्स यांनी डावाची सुरुवात केली. मात्र मोहम्मद शमीने मेडन ओव्हरने सुरुवात केल्याने सामना चुरशीचा होणार याची कुणकुण लागली. पहिल्या चार षटकांत संघाने एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या.
पॉवरप्लेनंतर लखनौचा स्कोअर बिनबाद 53 होता. मात्र, 55 धावांवर लखनौ संघाची पहिली विकेट पडली. काइल मेयर्स 19 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. राशिद खानने त्याला क्लीन बोल्ड केले. मेयर्सने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. 10 षटकांनंतर लखनौची धावसंख्या एका विकेटवर 80 धावा अशी होती.
लोकेश राहुलने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले आणि सामन्यातला उत्साह कायम ठेवला. 13 षटकांनंतर लखनौची धावसंख्या एका विकेटवर 98 होती. या संघाला विजयासाठी 36 चेंडूत 31 धावांची गरज असताना अचानकपणे दृष्ट लागली. लखनौ सुपर जायंट्सची दुसरी विकेट 106 धावांच्या स्कोअरवर पडली. क्रुणाल पांड्या 23 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. नूर अहमदने त्याला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकरवी यष्टिचित केले. 110 धावांच्या स्कोअरवर लखनौची तिसरी विकेट पडली. निकोलस पूरन सात चेंडूत एक धाव काढून बाद झाला. नूर अहमदच्या चेंडूवर कर्णधार हार्दिक पंड्याने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
126 धावांवर लखनौची चौथी विकेट पडली. कर्णधार लोकेश राहुल 61 चेंडूत 68 धावा करून बाद झाला. मोहित शर्माने त्याला जयंत यादवकरवी झेलबाद केले. 126 धावांच्या स्कोअरवर लखनौची पाचवी विकेट पडली. मार्कस स्टॉइनिस पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. मोहित शर्माने त्याला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. 127 धावांच्या स्कोअरवर लखनौची सहावी विकेट पडली. आयुष बडोनी दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. मोहित शर्माने अचूक थ्रोवर बेल विखुरत विजय शंकरला धावबाद केले. 128 धावांच्या स्कोअरवर लखनौची सातवी विकेट पडली. दीपक हुडाही दोन चेंडूंत दोन धावा करून धावबाद झाला.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने सहा विकेट्सवर 135 धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋद्धिमान साहाने 47 धावांची शानदार खेळी केली. या दोघांशिवाय केवळ विजय शंकर (10 धावा) दहाचा आकडा पार करू शकला. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी अभिनव मनोहर तीन आणि डेव्हिड मिलर सहा धावा करून बाद झाले. लखनौकडून कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. नवीन-उल-हक आणि अमित मिश्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली. लखनौमध्ये अवघड वाटेवर 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे लोकेश राहुलच्या संघासाठी सोपे नसेल.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची पहिली विकेट चार धावांवर पडली. शुभमन गिल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तो रवी बिश्नोईच्या हाती कृणाल पांड्याकरवी झेलबाद झाला. गिलच्या विकेटनंतर हार्दिक पांड्या ऋद्धिमान साहाची जोडी जमली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सने एक गडी गमावून 40 धावा केल्या. यातील सर्वाधिक धावा ऋद्धिमान साहाच्या बॅटमधून आल्या. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. साहाने आपल्या खेळीत सहा चौकार मारले.
गुजरात टायटन्सची दुसरी विकेट 72 धावांवर पडली. ऋद्धिमान साहा 37 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. कृणाल पांड्याने त्याला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. कॅप्टन हार्दिकसोबत अभिनव मनोहर क्रीजवर खेळत असताना गुजरातची धावसंख्या 11 षटकांत 2 बाद 75 अशी झाली होती. 77 धावांवर गुजरात टायटन्सची तिसरी विकेट पडली. पाच चेंडूत तीन धावा करून अभिनव मनोहर बाद झाला. अमित मिश्राने त्याला नवीन-उल-हककरवी झेलबाद केले. गुजरातची धावसंख्या 12 षटकांत 3 बाद 78 अशी झाली.
त्यानंतर विजय शंकर 12 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. नवीन-उल-हकने त्याला क्लीन बोल्ड केले. अशा प्रकारे ठराविक अंतराने मोक्याच्या क्षणी विकेट्स पडत गेल्याने गुजरातची अवस्था 4 बाद 92 झाली. यावेळी 15 षटकांचा खेळ झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्याचे हार्दीक पंड्याचे मनसुबे उध्वस्त झाले. कर्णधार हार्दिकने आपले अर्धशतक 44 चेंडूत पूर्ण केले. त्याने 50 चेंडूंच्या खेळीत 66 धावा करताना 2 चौकार आणि 4 षटकार लगावले. मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर राहुलने त्याचा झेल घेतला. लखनौच्या कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी दोन विकेटस घेतल्या.
तोंडचा घास हिरावला…
अतिशय सहज विजय मिळणे शक्य असताना आणि अवघ्या 136 धावांचा पाठलाग करणे बाकी असताना हातातला सामना कसा घालवायचा, याचे उदाहरणच लखनौ सुपर जायंटसने घालून दिले. मोहितच्या अखेरच्या षटकांत सलग चार चेंडूंवर चार विकेट्स पडल्याने गुजरात टायटन्सने हा सामना सात धावांनी जिंकला.