पुणे -टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध बचत योजनांवरील व्याजदरात अद्याप कोणताही बदल होणार नसून, येत्या मार्चपर्यंत सध्या असलेले दर कायम राहणार आहे, अशी माहिती टपाल विभागातर्फे देण्यात आली.
टपाल विभागातर्फे नागरिकांच्या सोयीसाठी विविध लघु तसेच दीर्घकालीन बचत योजना राबविण्यात येतात. यामध्ये कन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र, निवृत्तिवेतन योजना, लघुकलीन बचत योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात.
या योजनांतर्गत ठराविक कालावधीसाठी विशिष्ट रक्कम भरून मुदत पूर्ण झाल्यावर नागरिकांना वाढीव रक्कम देण्यात येते. यासाठी दर तीन महिन्यांनी या योजनांचे व्याजदर जाहीर केला जात असून, यापूर्वी ऑक्टोबरमध्ये हा व्याजदर जाहीर करण्यात आला होता. जानेवारीमध्ये नवीन बदल जाहीर होणे अपेक्षित असतानाच, मार्चपर्यंत आता असलेलेच व्याजदर कायम राहणार आहेत.