INDW vs AUSW : विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची दमदार तयारी, भारताचा २-१ ने धुव्वा उडवत मालिका जिंकली

INDW vs AUSW Australia beat India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी जिंकत मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. या हाय-स्कोअरिंग सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 47.5 षटकांत सर्वबाद 412 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने शर्थीचे प्रयत्न केले, पण 369 धावांपर्यंतच मजल मारली आणि सामन्यासह मालिका गमावली. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने विश्वचषकापूर्वी आपली तयारी दाखवून दिली.
ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी –
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर एलिसा हीली आणि जॉर्जिया वॉल यांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. हीली 30 धावांवर बाद झाली, पण वॉल आणि एलिस पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत पाया रचून दिला. वॉलने शानदार अर्धशतक ठोकले आणि 81 धावांवर बाद झाली.
🚨 AUSTRALIA WIN ODI SERIES vs INDIA 2-1 🚨
India showed plenty of fight & will carry positives into the World Cup. 🇮🇳💪#INDvAUS #TeamIndia #ODI #AsiaCup2025 #VIRAL #indvsaus pic.twitter.com/OOtVf3IQfh— TrollKaTaj | Memes • Polls • IPL (@trollkataj) September 20, 2025
यानंतर पेरी आणि बेथ मूनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी आणखी एक शतकीय भागीदारी रचली. पेरी 68 धावांवर बाद झाली, तर मूनीने अविश्वसनीय खेळी करत 57 चेंडूंमध्ये शतक ठोकले. मूनी 138 धावांवर बाद झाली. याशिवाय, अॅश्ले गार्डनरने 39, जॉर्जिया व्हेयरहमने 16, अलाना किंगने 12 आणि तालिया मॅक्ग्राने 14 धावा जोडत ऑस्ट्रेलियाचा डाव 412 धावांपर्यंत नेला. भारतासाठी अरुंधती रेड्डीने 3, दीप्ती शर्माने 2, रेणुका सिंहने 2 आणि क्रांती गौडने 1 विकेट्स घेतली.
हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मंधाना पुन्हा सुसाट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान शतक ठोकत किंग कोहलीलाही टाकलं मागे
भारताची खराब सुरुवात, मंधानाचे वादळी शतक –
प्रत्युत्तरात 413 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर प्रतिका रावल 10 धावांवर, तर हरलीन देओल 11 धावांवर बाद झाली. यानंतर स्मृती मंधानाने एका बाजूने डाव सांभाळला आणि 23 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीत कौरने मंधानाला चांगली साथ देत तिसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली.
हरमनप्रीत 52 धावांवर बाद झाली, पण मंधानाने 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत इतिहास रचला. ती सर्वात जलद शतक ठोकणारी जगातील दुसरी महिला फलंदाज ठरली.मात्र, 125 धावांवर मंधाना बाद झाली. यानंतर दीप्ती शर्माने 72 धावांची खेळी करत पारी सावरण्याचा प्रयत्न केला. राधा यादवने 18, स्नेह राणाने 35 आणि अरुंधती रेड्डीने 10 धावा जोडल्या. पण भारतीय संघ 369 धावांवर सर्वबाद झाला आणि 43 धावांनी पराभूत झाला.





