INDW vs AUSW : बेथ मूनीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास! भारताविरुद्ध नोंदवला खास पराक्रम

INDW vs AUSW Women Set Record 412 Runs : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार एलिस पेरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि बेथ मूनीच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 412 धावांचा विशाल स्कोर उभारत इतिहास रचला आहे.
ऑस्ट्रेलियाने उभारला सर्वाधिक धावांचा डोंगर –
वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाविरुद्ध कोणत्याही संघाने 400 हून अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 412 धावा हा भारतीय महिला संघाविरुद्ध वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 371 धावा केल्या होत्या, जो त्यावेळचा उच्चांक होता.
बेथ मूनीचे आक्रमक शतक –
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर एलिसा हीली आणि जॉर्जिया वॉल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. हीली 30 धावा काढून बाद झाली, परंतु त्यानंतर जॉर्जिया वॉल आणि कर्णधार एलिस पेरी यांनी भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही. पेरीने 68 धावांची खणखणीत खेळी केली, तर वॉलने 81 धावांचे योगदान दिले.
मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बेथ मूनीने मैदान गाजवले. तिने अवघ्या 75 चेंडूंमध्ये 138 धावांची तुफानी खेळी केली, ज्यात 23 चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. या खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलियाला 412 धावांचा डोंगर उभारता आला.
हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मंधाना पुन्हा सुसाट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान शतक ठोकत किंग कोहलीलाही टाकलं मागे
ऑस्ट्रेलियाचा 28 वर्षांनंतर स्वतःच्या विक्रमाशी बरोबरी
412 धावा हा ऑस्ट्रेलियन महिला संघाचा वनडे क्रिकेटमधील संयुक्तपणे सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध 412 धावांचा स्कोर केला होता. आता 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली आहे.हा सामना भारतीय महिला संघासाठी मोठे आव्हान ठरला असून, आता सर्वांचे लक्ष भारतीय संघाच्या प्रत्युत्तराकडे लागले आहे.





