Industrial Fire – खेड तालुक्यातील कुरुळी येथील मॅच्युअल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज दुपारी दिडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग इतकी तीव्र होती की काही क्षणांतच संपूर्ण परिसर काळ्या धुराने व्यापला गेला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनही दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या भीषण आगीत कंपनीतील कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, पोलीस आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. कंपनीच्या नुकसानीचा नेमका आकडा पंचनामा झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.