Gas Cylinder Explosion : साकीनाका हादरलं ! एकापाठोपाठ 5 सिलिंडरचे कानठळ्या बसवणारे स्फोट
मुंबईतील वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या साकीनाका परिसरातील पाइपलाइन भागात आज अचानक एका भयंकर दुर्घटनेने (Gas Cylinder Explosion) हाहाकार उडवून दिला.

Gas Cylinder Explosion : मुंबईतील वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या साकीनाका परिसरातील पाइपलाइन भागात आज अचानक एका भयंकर दुर्घटनेने (Gas Cylinder Explosion) हाहाकार उडवून दिला.
नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या दैनंदिन गडबडीत अचानक आगीच्या महाभयंकर ज्वाळा उसळल्या आणि संपूर्ण परिसरात क्षणात घबराट पसरली. आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की, बघता बघता आकाशात काळ्याकुट्ट धुराचे प्रचंड लोट पसरले आणि अवघा परिसर धुराच्या साम्राज्यात हरवून गेला.
स्थानिक नागरिक काही समजून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच, कानठळ्या बसवणाऱ्या एकापाठोपाठ एक ४ ते ५ गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी (Gas Cylinder Explosion) संपूर्ण परिसर हादरवून सोडला. या भीषण स्फोटांच्या आवाजाने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि लोकांनी सुरक्षिततेसाठी सैरावैरा धाव घेतली. आग नेमकी कशामुळे भडकली आणि सिलिंडरचे स्फोट कशामुळे झाले, याचे गूढ अद्याप कायम आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आगीच्या ज्वाळा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाढती गर्दी बाजूला सारून परिस्थितीवर ताबा मिळवला.
या भीषण दुर्घटनेत (Gas Cylinder Explosion) कोणतीही जीवितहानी झाली आहे का, अथवा कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वित्तहानीचा अंदाज घेण्याचे आणि आगीच्या कारणाचा माग काढण्याचे काम सध्या प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.






