Pune District : कुरुळीत अतिक्रमणांवर मोठी कारवाई
Pune District : ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी सामोपचाराने सुमारे 16 फूट रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार अनेकांनी आपली बांधकामे मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले.

चिंबळी : खेड तालुक्यातील कुरुळी येथे बुधवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्यालगतच्या पत्र्याच्या टपर्या आणि तात्पुरती बांधकामे हटविण्यात आली असून, नऊ मीटर रस्त्याच्या हद्दीत येणारी पक्की बांधकामे काढून घेण्यासाठी संबंधितांना 15 दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या कारवाईनंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी सामोपचाराने सुमारे 16 फूट रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार अनेकांनी आपली बांधकामे मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, त्यानंतर नऊ मीटर रस्त्याची हद्द निश्चित करून वडिलोपार्जित मिळकतीवरील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. कोणताही मोबदला न मिळता जागा सोडावी लागत असल्याची खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
रस्ता रुंदीकरण आणि गावाच्या विकासाला आपला विरोध नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत सहकार्य केल्यानंतर प्रशासनाने आता रस्त्याचे काम विनाविलंब सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन रस्ता तयार करताना केवळ रुंदी वाढविण्यावर भर न देता रस्त्याची उंची, घरांची पातळी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांचे योग्य नियोजन करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
काही भागांत रस्ता उंच आणि घरे खाली असल्याने पावसाळ्यात पाणी घरांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य गटारी आणि जलनिस्सारणाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटवून रस्त्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष काम लांबणीवर पडू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे आणि भविष्यात पुन्हा रस्ता उखडण्याची वेळ येऊ नये, यासाठी तांत्रिक निकषांनुसार काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काम दर्जेदार करा
‘कुरुळीकरांनी विकासाला विरोध केलेला नाही. अतिक्रमण कारवाईलाही सहकार्य केले आहे. आता प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने, उत्तम दर्जाने आणि जलनिस्सारणाचे योग्य नियोजन करून करावे. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास ग्रामस्थ त्याला विरोध करतील,’ असा इशारा स्थानिकांनी दिला. खेड तालुक्यातील निवासी भागात झालेल्या मोठ्या अतिक्रमण कारवायांपैकी कुरुळीतील ही कारवाई असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पक्क्या बांधकामांसाठी दिलेली 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून कोणती पुढील कारवाई केली जाते, तसेच रस्त्याचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
अतिक्रमण कारवाईनंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे.
रस्त्याची उंची आणि घरांची पातळी यांचा विचार करून काम करावे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूंना योग्य गटारी कराव्यात.
रस्त्याचे काम तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.





