Pune News : झाडावर गळफास घेण्याचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचविले
संबंधित व्यक्तीला सुखरूप खाली उतरविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करून पथक अग्निशमन केंद्रात परतले.

Pune News – स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौक परिसरात एका व्यक्तीने झाडावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत मानवी मनोरा तयार करून दोरी कापली आणि संबंधित व्यक्तीला सुखरूप खाली उतरविले.
उमेश गोकुळ मिरगणे (रा. शंकर महाराज मठ परिसर) हे झाडावर सुमारे १८ ते २० फूट उंचीवर नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जनता अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मानवी मनोरा तयार केला. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने दोरी कापून मिरगणे यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अधिकारी अमोल कर्डेकर, तांडेल राजेश कांबळे, चालक हातमोडे तसेच फायरमन विक्रम गायकवाड, जयेश गांगोडा, अमित रासकर आणि अथर्व काटे यांच्या पथकाने केली. संबंधित व्यक्तीला सुखरूप खाली उतरविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करून पथक अग्निशमन केंद्रात परतले.





