Indian Football Team : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर 6 जून रोजी कुवेत विरुद्ध भारताच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सांगितले आहे. ही माहिती त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुमारे 9 मिनिटांच्या व्हिडिओव्दारे दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या डेब्यू सामन्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे
सुनील छेत्रीने (Sunil Chhetri Retirement) भावूक होऊन सोशल मीडियावर एक पोस्ट करताना म्हटले आहे की, “तुम्हाला माहीत आहे, गेल्या 19 वर्षांतील मला आठवत असलेली भावना म्हणजे कर्तव्य, दबाव आणि प्रचंड आनंद यांचा उत्तम मिलाफ आहे.” पुढे त्याने म्हटले आहे की, “मी माझा पहिला सामना खेळलो तो मला अजूनही आठवतोय. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. मुळात मला कधीच वाटलं नव्हतं की, मी भारतासाठी इतके सामने खेळू शकेन. मी या निर्णयाबाबत पहिल्यांदा माझ्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली”.
छेत्रीने तरुणांनी पुढे जाण्यासाठी आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठीही भर दिला. छेत्री म्हणाला, “मला वाटते की आता भारताला पुढील क्रमांक 9 शोधण्याची वेळ आली आहे. आता त्यावर आपण काम करण्याची वेळ आली आहे. मी तिथे नसलो तरी, मला खात्री आहे की बरेच तरुण पुढे येतील, पण त्यांना वेळ लागेल.”
I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
39 वर्षीय अनुभवी खेळाडूची निवृत्ती हा एका युगाचा शेवट म्हणता येईल. सिकंदराबादमध्ये जन्मलेल्या या स्ट्रायकरने जवळजवळ एकट्याने भारताला जागतिक फुटबॉलमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली. सुनील छेत्रीने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि सीनियर पदार्पणातच पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला.
सुनील छेत्रीने 2005 साली पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 19 वर्षात छेत्रीने आपल्या देशासाठी 150 सामने खेळले आणि 94 गोल केले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल (94) करणारा तो चौथा खेळाडू आहे . त्याच वेळी, क्रिस्टियानो रोनाल्डो, अली दाई आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर, सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा तो तिसरा खेळाडू आहे. या अनुभवी फॉरवर्ड खेळाडूने भारताच्या 2008 AFC चॅलेंज कप जिंकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे संघाला 27 वर्षांनंतर पहिल्या AFC आशियाई कप (2011) साठी पात्र ठरविण्यात मदत झाली. 2012 पासून तो भारतीय पुरुष संघाचा कर्णधार आहे.
Federation Cup 2024 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक….
त्याला 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, छेत्रीने 2021-22 मध्ये नवीनतम पुरस्कारासह सात वेळा AIFF प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. भारतीय राष्ट्रीय संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा तो फुटबॉल खेळाडू आहे. गेल्या दोन दशकात भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रत्येक मोठ्या कामगिरीत छेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने भारताला नेहरू चषक (2007, 2009, 2012) तसेच SAFF चॅम्पियनशिप (2011, 2015, 2021) जिंकण्यास मदत केली.