कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील परळेनिनाई येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रखूबाई निनू कंक (७०) आणि निनू यशवंत कंक (७५) या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. निनाई परळीजवळ असलेल्या भेंडवडे गावाबाहेर असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाचे हात आणि पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमक्या कोणत्या वन्य प्राण्याने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.