Manoj Jarange – बीडच्या दासखेड फाटा येथे एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अतुल घरत हे बीड तालुक्यातील महाजनवाडीचे रहिवासी असून, पाटोदा येथून आपल्या गावी जात असताना दासखेड फाटा येथे हा अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, ते जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहनचालक तत्काळ फरार झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. या गाडीत पोलिसांचा गणवेश असल्याचेही सांगितले जात आहे. घरत हे जरांगे यांचे सक्रिय समर्थक असल्याने हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला घातपात असावा, असा संशय व्यक्त केला जाता आहे. या संशयाची सुई वाल्मीक आण्णा कराड यांच्या दिशेने जात आहे. कारण मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कराडवर गंभीर आरोप केले होते. या कारणातून हा घातपात घडवलेला असू शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.