लंडन :- ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानी कट्टरवाद्यांकडून स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश दिला गेला नसल्याचा स्कॉटलंडमधील गुरुद्वाराने निषेध केला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचेही गुरुद्वाराने म्हटले आहे.
स्कॉटलंडमधील स्लासगो गुरुग्रंथसाहिब शीख सभा गुरुद्वाराने यासंदर्भात शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. काही अज्ञात आणि अनियंत्रित युवकांनी गुरुद्वाराच्या परिसरातील शांतता भंग केली आणि स्कॉटलंडच्या संसदेने मान्यता दिलेल्या उच्चायुक्तांच्या भेटीमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे उच्चायुक्त तेथून निघून गेल्याचे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
दोराईस्वामी तेथून निघून गेल्यानंतर खलिस्तानी युवकांनी गुरुद्वाराच्या परिसरामध्ये गोंधळ घातला. या प्रकाराबद्दल ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाला आणि ग्लासगोच्या महानगर पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानंतर या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. शीख गुरुद्वाराच्या परिसरातील शांतता भंग करण्याच्या कृतीचा गुरुद्वाराच्या वतीने तीव्र निषेध केला जातो आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.