IND W vs ENG W : शेवटच्या ३ चेंडूंत फिरला गेम! सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताचा ५ धावांनी पराभव; ऋचा घोषची खेळी ठरली व्यर्थ
IND W vs ENG W : कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारतीय संघाला ५ धावांनी धूळ चारली.

IND W vs ENG W Warm Up Match Richa Ghosh : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचा मुख्य थरार सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसऱ्या आणि अंतिम सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारतीय संघाला ५ धावांनी धूळ चारली. आदल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋचा घोष हिने या सामन्यात ६८ धावांची तुफानी खेळी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु शेवटच्या षटकात घात झाला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडचे १७१ धावांचे मोठे आव्हान –
या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७१ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. इंग्लंडकडून सलामीवीर एमी जोन्सने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली, तर कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने ५७ धावांचे मोलाचे योगदान दिले. डॅनी गिब्सन ३० धावांवर नाबाद राहिली. भारताकडून गोलंदाजीत श्रेयांका पाटीलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शफाली वर्मा, रेणुका सिंह, राधा यादव आणि श्री चरानी यांना प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाली.
ऋचा घोषची झुंजार खेळी; शेवटच्या क्षणी फिरला सामना!
A terrific effort of 68(36) by Richa Ghosh 👏👏
But England win by 5 runs in Cardiff.#TeamIndia will now shift their focus towards their #T20WorldCup opener on the 14th of June.#WomenInBlue pic.twitter.com/S5teiZRBer
— BCCI Women (@BCCIWomen) June 10, 2026
१७२ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेली स्मृती मानधना अवघी एक धाव काढून बाद झाली, तर शफाली वर्माही १३ धावा करून तंबूत परतली. यास्तिका भाटिया (१५), कर्णधार हरमनप्रीत कौर (१७) आणि भारती फुलमाली (१८) यांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत.
मात्र, विकेटकीपर फलंदाज ऋचा घोषने एकटीने खिंड लढवत अवघ्या ३६ चेंडूंत ९ चौकार आणि २ खणखणीत षटकारांच्या मदतीने ६८ धावांची तुफानी खेळी केली. भारताला विजयासाठी शेवटच्या ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना ऋचा घोष बाद झाली आणि भारताचे स्वप्न भंगले. भारतीय संघ १९.५ षटकांत १६६ धावांवर ऑलआऊट झाली. या पराभवानंतर आता टीम इंडिया १४ जून रोजी विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात थेट पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे.





