IND vs SA 2nd T20 : द. आफ्रिकेविरुद्ध आज भारताचा दुसरा टी-20 सामना; ‘या’ खेळाडूची मालिकेतून माघार…

केबेरा :- यजमान दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात आज (मंगळवार) दुसरा टी-२० सामना होत आहे. रविवारी पहिला सामना संततधार पावसाने रद्द करावा लागल्याने आता याच दोन सामन्यांत चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय संघातील नवोदित खेळाडूंसमोर राहणार आहे. त्यातच ही मालिका पार पडल्यावर मायदेशात भारतीय संघ अफगाणिस्तानशी ३ टी-२० सामने खेळणार आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी आता भारतीय संघाच्या हाती खूपच कमीवेळ राहिला असून एक सामना पावसाने रद्द झाल्यामुळे उरलेले पाचच सामने भारतीय संघाला सरावासाठी मिळणार आहेत.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मधल्या फळीत मोठी चुरस रंगणार आहे. सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार असल्याने त्याचे स्थान निश्चित आहे. मात्र, इशान किशन, तिलक वर्मा व रिंकू सिंग यांच्यात स्पर्धा होणार आहे. सलामीवीर म्हणून शुभमन गिलसह कोण डावाची सुरुवात करणार हा देखील प्रश्न आहे. ऋतुराज गायकवाड व यशश्वी जयस्वाल यांच्यापैकी एकाला संधी द्यावी लागेल. हे दोन्ही खेळाडू भरात असल्याने अंतिम संघ निवड करणे ही सूर्यकुमारसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यातच जीतेश शर्मानेही चुणूक दाखवल्यामुळे इशानला खेळवायचे की जीतेशला याचा निर्णय देखील सोपा नसेल.
दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्या मालिका पार पडल्यानंतर भारतीयच नव्हे तर अनेक देशांचे खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळतील व त्यातही सराव मिळेल मात्र, जो दबाव आंतरराष्ट्रीय सामन्याचा असतो तो आयपीएल स्पर्धेत नसेल. त्यामुळे केवळ पाच आंतरराष्ट्रीय टी-२० लढतीच भारतासाठी महत्वाच्या आहेत.
गोलंदाजीच्या बाबत बोलायचे तर अर्शदीपसिंगने चांगले सातत्य दाखवले आहे. मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यानेच प्रमुख गोलंदाजाचा भार वाहिला होता. आता त्याच्या जोडीला महंमद सिराजही असल्याने भारतीय गोलंदाजी बळकट दिसत आहे. नवोदित मुकेश कुमारकडून अपेक्षा आहेत.
IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या T20 सामन्यावरही पावसाचे ढग, हवामानाबाबत मोठी अपडेट आली समोर…
दक्षिण आफ्रिकेचा संघही कमकुवत नाही परंतू त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत सुरुवातीला दाखवले ते सातत्य कायम राखता आले नव्हते. त्यांच्या संघाचे नेतृत्व एडन मार्करम करत असून तोच गेल्या काही मालिकांपासून धावांसाठी चाचपडत आहे. या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसाने रद्द झाला असल्याने मालिका जिंकण्यासाठी आता दोन्ही संघांना उरलेले दोनही सामने जिंकावे लागतील.
बिष्णोईची गोलंदाजी निर्णायक ठरेल
नवोदित लेग स्पीन गोलंदाज रवी बिष्णोई याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपल्या फिरकीच्या तालावर दीग्गज फलंदाजांना नाचवले होते. तेच चित्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धही दिसेल अशा अपेक्षा त्याने वाढवल्या आहेत. जर या मालिकेत तो यशस्वी ठरला तर सहा महिन्यांनंतर होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान मिळेल अशीही शक्यता नाकारता येत नाही.
ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…
चहरची माघार
भारतीय संघात पुनरागमन केलेला गोलंदाज दीपक चहर वैयक्तिक कारणाने मायदेशी परतला होता. तो अद्याप दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेला नाही. त्यामुळे तो या संपूर्ण मालिकेतही खेळू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे. दुखापतीतून सावरल्यावर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडल्यामुळे मुकेश कुमारचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.





