IND vs NZ 3rd T20 : भारताचा ‘विराट’ विजय! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिका खिशात; अभिषेक-सूर्याची तुफान फटकेबाजी
IND vs NZ 3rd T20 : भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला.

IND vs NZ 3rd T20 India beat New Zealand : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत आपला दबदबा कायम राखत सलग तिसरा सामना जिंकत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. भारताने तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवत मालिकेत ३-० अशा विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य अभिषेक-सूर्याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर १० षटकांत पार करून न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे लचके तोडले.
किंवींची माफक धावसंख्या आणि भारताचा जोरदार पलटवार –
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला २० षटकांत ९ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे किवी फलंदाजांनी नांगी टाकली. १५४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा झटका लागला. सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर जे घडलं त्याची कल्पना न्यूझीलंडच्या संघाने स्वप्नातही केली नसेल. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
Simply excellent, with 10 overs to spare! 👌
A whirlwind 8⃣-wicket victory for #TeamIndia in Guwahati 🥳
They clinch the #INDvNZ T20I series with an unassailable lead of 3⃣-0⃣ 👏
Scorecard ▶️ https://t.co/YzRfqi0li2@IDFCFIRSTBank pic.twitter.com/zgp3FIz2o4
— BCCI (@BCCI) January 25, 2026
पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस: ६ ओव्हरमध्ये ९४ धावा!
पहिली विकेट गेल्यावरही भारताने बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक खेळ सुरू केला. इशान किशनने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारून इरादे स्पष्ट केले. त्यानंतर अभिषेक शर्माने मैदानावर अक्षरशः वादळ आणले. त्याने अवघ्या १४ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक झळकावून त्याने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर भारताने पहिल्या ६ षटकांत तब्बल ९४ धावा कुटल्या. यात दुसऱ्या षटकात १६, तिसऱ्यात १७, चौथ्यात ११, पाचव्यात १२ आणि सहाव्या षटकात २२ धावा वसूल केल्या.
अभिषेक आणि सूर्याची तुफान फटकेबाजी –
इशान किशन बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या दोघांनीही स्फोटक फलंदाजी करत अवघ्या १० व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माने २० चेंडूंत नाबाद ६८ कुटल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने २६ चेंडूंत ५७ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचले. भारताच्या या विजयामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून मालिकेत आता भारताने ३-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.





