Abhishek Sharma : अभिषेकचा वर्ल्ड रेकॉर्ड! भल्याभल्या दिग्गजांना जे जमलं नाही, ते या २३ वर्षीय खेळाडूने करून दाखवलं

Abhishek Sharma World Record T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास रचला. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत अभिषेकने केवळ २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आजवर जगातील कोणत्याही फलंदाजाला जमला नव्हता.
जगातील पहिलाच फलंदाज!
अभिषेक शर्मा आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आज आठव्यांदा ही किमया साधली. या शर्यतीत त्याने इंग्लंडच्या फिल साल्टला (७ वेळा) मागे टाकले आहे.
२५ पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक अर्धशतके (T20I):
- अभिषेक शर्मा: ८ वेळा
- फिल साल्ट: ७ वेळा
- सूर्यकुमार यादव: ७ वेळा
- एविन लुईस: ७ वेळा
नागपुरात पाडला षटकारांचा पाऊस –
अभिषेकने या सामन्यात केवळ ३५ चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकार ठोकले. न्यूझीलंडविरुद्धच्या एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने किरॉन पोलार्डची बरोबरी केली आहे. ८४ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आणखी एक षटकार खेचण्याच्या नादात तो बाद झाला, मात्र तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले होते.
टॉस न्यूझीलंडचा, पण हवा भारताची!
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीला आलेल्या संजू सॅमसन आणि इशान किशनच्या स्वस्तात बाद होण्याने दडपण आले होते, पण अभिषेकने मैदानच्या चहूकडे फटकेबाजी करत किवी गोलंदाजांना हतबल केले. यानंतर अंतिम टप्प्यात रिंकू सिंगने फटकेबाजी करत भारताची धावसंख्या २३८ धावांपर्यंत पोहोचवले.





