IND vs ENG : ऋषभ पंतच्या दुखापतीने भारताला धक्का; पाचव्या कसोटीसाठी युवा खेळाडूला दिली संधी

IND vs ENG N Jagadeesan replace Rishabh Pant : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मँचेस्टर येथे खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले, परंतु भारताला ऋषभ पंतच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. तो या सामन्यादरम्यान जखमी झाला. सामना संपल्यानंतर बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबाबत अपडेट दिले.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे पंत मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अनकॅप्ड यष्टीरक्षक एन. जगदीशनला संघात सामील करण्यात आले आहे. बीसीसीआयने सांगितले की, पंतच्या उजव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे, ज्यामुळे तो पाचव्या कसोटीत भाग घेऊ शकणार नाही.
दुखापत होऊनही पंतने केली फलंदाजी –
मँचेस्टर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंत क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाला लागला. दुखापत आणि वेदनांमुळे त्याला मैदान सोडावे लागले. डॉक्टरांनी त्याला ६ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. परंतु, गरज पडल्याने दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीसाठी परतला आणि त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले.
हेही वाचा – IND vs ENG : जडेजा-सुंदरच्या शतकांमुळे स्टोक्स अस्वस्थ, हस्तांदोलन करताना गिलकडे केले दुर्लक्ष
पंतच्या जागी जगदीशनला मिळाली संधी –
बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “ऋषभ पंत मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देते.”
🚨 𝗦𝗾𝘂𝗮𝗱 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲 🚨
Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury; N Jagadeesan named replacement.
All The Details 🔽 #TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 27, 2025
बीसीसीआयच्या निवेदनात असेही नमूद आहे की, पुरुष निवड समितीने ३१ जुलै २०२५ पासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी ऋषभ पंतच्या जागी नारायण जगदीशनला संघात स्थान दिले आहे.
हेही वाचा – Divya Deshmukh : १९ वर्षीय दिव्याने रचला इतिहास: फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरल्यानंतर भावुक
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अभिमन्यु ईश्वरन, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीशन (यष्टीरक्षक).





