IND vs ENG : राहुल-गिलने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास, मोडला २३ वर्षांपूर्वीचा भागीदारीचा विक्रम

IND vs ENG Shubman Gill and KL Rahul set a new record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा पाचवा दिवस असून भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. एकही धाव न करता भारताने दोन गडी गमावले. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्यात १८८ धावांची शानदार भागीदारी झाली. या भागीदारी दरम्यान त्यांनी ४१७ चेंडूंचा सामना केला आणि इंग्लंडमध्ये एक नवा इतिहास रचला.
राहुल-गिलने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास –
इंग्लंडमध्ये एका भागीदारीदरम्यान सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम यापूर्वी राहुल द्रविड आणि संजय मांजरेकर यांच्या नावावर होता. त्यांनी २००२ मध्ये लीड्स कसोटी सामन्यात १७० धावांची भागीदारी केली होती आणि ४०५ चेंडू खेळले होते. आता हा विक्रम शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी मोडला आहे. त्यांनी ४१७ चेंडू खेळून २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी आहे, ज्यांनी ३५७ चेंडू खेळले होते.
केएल राहुलचे शतक हुकले थोडक्यात –
1⃣7⃣4⃣*(373)
KL Rahul 🤝 Shubman Gill
Time for action on the final day in Manchester!
Updates ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/zJr0YtYVyz
— BCCI (@BCCI) July 27, 2025
चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केएल राहुलकडे शतक झळकावण्याची उत्तम संधी होती, पण तो शतकापासून १० धावा दूर राहिला. त्यांनी २३० चेंडूंत ९० धावा केल्या, ज्यामध्ये ८ चौकार मारले. त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पायचीत केले. ज्यामुळे गिलसोबतची त्याची १८८ धावांची भागीदारी संपुष्टात आली आणि भारताला तिसरा धक्का बसला.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने झळकावले ऐतिहासिक शतक, सचिननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
शुबमन गिलने झळकावले शानदार शतक –
दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने या डावात शानदार शतक झळकावले. त्याने २२८ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. तो शतक झळकावल्यानंतर अवघ्या तीन धावांनी बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार मारले. त्याच्यानंतर फलंदाजी आलेला साई सुदर्शन भोपळाही फोडू शकला नाही. सध्या भारतीय संघाने लंच ब्रेकपर्यंत ४ बाद २३४ धावा केल्या असून ८८ धावांनी पिछाडीवर आहे. सध्या वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. हा सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना पाचव्या दिवशी उत्तम फलंदाजी करावी लागेल.





