IND vs ENG : भारताविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडसाठी वाईट बातमी, आयसीसीने संपूर्ण संघावर केली मोठी कारवाई

IND vs ENG England Fined for Slow Over Rate : स्मृती मंधानाच्या पहिल्या टी-२० शतक आणि पदार्पण सामन्यात फिरकीपटू श्री चरणीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ९७ धावांनी पराभूत केले. यामुळे भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ही इंग्लंडची महिला टी-२० मधील सर्वात मोठी हार आहे. या मोठ्या पराभवानंतर इंग्लंडसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंड संघावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
कर्णधाराने मान्य केली चूक –
नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला टी-२० सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडवर सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करत सांगितले की, एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनलचे मॅच रेफरी हेलन पॅक यांनी हा दंड लावला आहे. त्यांनी वेळेच्या सवलतीचा विचार करता इंग्लंडला निर्धारित वेळेत दोन ओव्हर कमी टाकल्यामुळे दोषी ठरवले. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने आपली ही चूक आणि दंड स्वीकारला आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
सर्व खेळाडूंना दंड –
England have been fined for maintaining a slow over rate during the first T20I against India.https://t.co/TEoPUI2e5R
— ICC (@ICC) June 29, 2025
हा दंड आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार आहे, जे स्लो ओव्हर रेट उल्लंघनाशी संबंधित आहे. आयसीसीच्या या नियमांतर्गत, निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंवर त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या ५ टक्के दंड आकारला जातो.
हेही वाचा – षटकार मारल्यानंतर फलंदाजाला आला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच सोडले प्राण, VIDEO व्हायरल
टी-२० मालिकेत भारताची विजयी सुरुवात –
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे. आता दुसरा सामना १ जुलै रोजी होणार आहे. तिसरा सामना ४ जुलै आणि चौथा सामना ९ जुलै रोजी खेळला जाईल. १२ जुलै रोजी मालिकेतील शेवटचा सामना होईल. त्यानंतर १६ जुलैपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.





