IND vs ENG : ‘…तर मग त्याला खेळवता कशाला?’, संतप्त दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल

या सामन्यादरम्यान भारतीय संघाने एक चूक केली. या चुकीमुळे इंग्लंड संघाला फायदा होऊ शकतो. याच कारणामुळे इंग्लंड संघ अजूनही सामन्यात टिकून आहे. भारतीय संघाच्या या चुकीमुळे माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक संतापला आहे. त्यानी संघ व्यवस्थापनाच्या शार्दुल ठाकूरबद्दलच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दिनेश कार्तिक का संतापला?
हेडिंग्ले कसोटीसाठी शार्दूल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याला चौथा गोलंदाज म्हणून खेळवण्यात आले. मात्र, भारतीय संघाने पहिल्या डावात १००.४ षटकांपर्यंत त्याचा योग्य वापर केला नाही. शार्दूलने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध केवळ ६ षटके गोलंदाजी केली. शार्दूल ठाकूरला संघात स्थान देऊनही त्याच्याकडून कमी षटके करवून घेतल्याने दिनेश कार्तिक नाराज झाला आहे.
हेही वाचा – क्रिकेट विश्वावर शोककळा; IND vs ENG कसोटीदरम्यान भारताच्या माजी फिरकीपटूचे निधन
काय म्हणाला दिनेश कार्तिक?
दिनेश कार्तिकने क्रिकबझशी बोलताना भारताच्या संघ व्यवस्थापनावर नाराजी केली. तो म्हणाला, “शार्दुल ठाकूरच्या निर्णयाकडे भारतीय संघ व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. जर त्यांना शार्दुलच्या गोलंदाजीवर विश्वास नसेल, तर त्याला खेळवण्याचा प्रश्नच येत नाही. हा निश्चितपणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही एखाद्या गोलंदाजावर विश्वास ठेवणार नसाल, तर मग त्याला का खेळवले? मला समजते की जेव्हा तुम्ही चार वेगवान गोलंदाजांना खेळवता, तेव्हा तुम्ही शार्दुलला समान संधी देणार नाही.”
हेही वाचा – Tilak Varma : इंग्लंडच्या भूमीवर भारतीय खेळाडूचा धमाका! पदार्पणाच्या सामन्यातच झळकावलं दमदार शतक
सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला शानदार सुरुवात करून दिली. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद ११७ धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना आता आणखी २५४ धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला १० विकेट्स घेण्याची गरज आहे.





